कासारी खोऱ्यात महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:36+5:302021-03-07T04:21:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अणुस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा, पेंडाखळे, मांजरे, गिरगाव, नांदारी या गावांमध्ये महिलांना सरपंचपदी संधी मिळाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अणुस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा, पेंडाखळे, मांजरे, गिरगाव, नांदारी या गावांमध्ये महिलांना सरपंचपदी संधी मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या कासारी खोऱ्यातील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रत्येक गावात निम्म्यापेक्षा अधिक महिला सदस्य आहेत; तसेच सरपंचपदी विराजमान झालेल्या महिला पूर्वीप्रमाणे अशिक्षित, अंगठेबहाद्दर नसून, सुशिक्षित व गावातील मूलभूत समस्यांची जाण असलेल्या आहेत. गावकऱ्यांनीसुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या आहेत.
गावातील महिलांचे प्रश्न, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य ,शिक्षण, बालविकास व अणुस्कुरा घाट पर्यटन विकास, इत्यादी बाबींचा विकास करण्यावर भर देणार आहे.
- सौ. दीप्ती दीपक पाटील, सरपंच, अणुस्कुरा
पेंडाखळे व अंतर्गत वाडीतील मूलभूत समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार; तसेच शाहूवाडीचे माजी सभापती पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करणार आहे.
- राधिका विलास सुतार, सरपंच, पेंडाखळे
बचतगटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यावर भर देणार आहे. विशेषतः मागासवर्गीय महिलांना आरोग्याच्या सुविधा देणार आहे.
गौरी सुनील कांबळे, सरपंच, नांदारी
गावच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन होत आहे. त्याचा गावच्या विकासासाठी उपयोग करून घेणार आहेत.
- सविता रायबा येडगे, सरपंच, गिरगाव
गावातील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण आयोजित करून उत्पादन वाढीवर भर देणार आहे. शेती, दूध व्यवसाय, शेळीपालन यांतून महिला स्वावलंबनावर भर देणार आहे.
- सुवर्णा बाबूराव पाटील, सरपंच, मांजरे