उजळाईवाडीत ‘महिलाराज’ने कारभाऱ्यांची गोची

By admin | Published: January 12, 2017 01:21 AM2017-01-12T01:21:43+5:302017-01-12T01:21:43+5:30

काँग्रेस विरुद्ध भाजप लढतीचे संकेत : मतदारसंघाची पुनर्रचना व आरक्षणामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली

Mahilaraj 's work to the caretaker | उजळाईवाडीत ‘महिलाराज’ने कारभाऱ्यांची गोची

उजळाईवाडीत ‘महिलाराज’ने कारभाऱ्यांची गोची

Next

विजय कदम-- कणेरी --पूर्वीचा गोकुळ शिरगाव व नवीन उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे व आरक्षणामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. उजळाईवाडी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव व कणेरी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. संपूर्ण उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात ‘महिलाराज’ झाल्यामुळे कारभाऱ्यांची गोची झाली आहे.
२०१२ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मीनाक्षी मोरे यांचा पराभव करून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी शशिकांत खोत निवडून आले, तर कणेरी पंचायत समितीमधून काँग्रेसचे अशोक पाटील विजयी झाले. गोकुळशिरगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणिमा माने यांनी बाजी मारली होती. शशिकांत खोत यांना दक्षिण मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन सतेज पाटील यांनी मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढविली आहे; परंतु विधानसभेच्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक विजयी झाल्यामुळे त्यांनी दक्षिण मतदारसंघासह उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची ताकद वाढविली आहे. दरम्यान, कंदलगावचे वसंत जिवबा पाटील यांना भाजपने तालुकाध्यक्षपद दिल्याने त्यांनी जिल्हा जनसंपर्क वाढवून भाजपची ताकद वाढवली आहे. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेसाठी आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या मतदारसंघात उजळाईवाडी जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या पत्नी सरिता खोत, तर पाचगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य मनीषा संजय वास्कर या इच्छुक आहेत, तर भाजपकडून तालुकाध्यक्ष वसंत पाटील यांच्या कन्या आरती योगेश यादव, महाडिक समर्थक शिवाजीराव मोरे यांच्या पत्नी मीनाक्षी मोरे, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील, कणेरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश विष्णू पाटील यांच्या कन्या स्वाती रमेश पाटील, तर राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य अरुणिमा माने याही जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
उजळाईवाडी पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून गोकुळ शिरगावचे ग्रामपंचायत सदस्य साताप्पा कांबळे यांच्या पत्नी सुनीता कांबळे व आरपीआयचे बबन शिंदे यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे या इच्छुक आहेत. भाजपकडून गोकुळ शिरगावच्या माजी सरपंच अश्विनी रंगराव कांबळे या इच्छुक आहेत.
कणेरी पंचायत समिती सर्वसाधारण महिलांसाठी असून यामध्ये शिवसेनेकडून शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत यांच्या पत्नी माधवी खोत, तर
काँग्रेसकडून नेर्लीच्या मंगल आनंदराव पाटील या इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाकडून भाजप करवीर तालुका उपाध्यक्ष नितीन संकपाळ यांच्या पत्नी प्रियांका संकपाळ या इच्छुक आहेत.


उजळाईवाडी
जिल्हा परिषद मतदारसंघातील गावे : उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली, तामगाव, विकासवाडी, हलसवडे.
उजळाईवाडी पंचायत समिती गावे : उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव.
कणेरी पंचायत समिती गावे : कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली, विकासवाडी, हलसवडे.

विकासकामांचा डोंगर
या मतदारसंघात आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी विकासकामांचा डोंगर रचला आहे, तर दक्षिण विधानसभेचे आमदार अमल महाडिक यांनी गावागावांत विकास करून विकासकामांचा धडाका लावून लोकांना संघटित ठेवण्याचे काम केले आहे.
संवेदनशील मतदारसंघ
राजकीय समीकरणे पाहता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होण्याचे संकेत आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघात संवेदनशील व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक राजकीय संघर्षाची सुरुवात झाली आहे. पक्षीय राजकारणापेक्षा गटा-तटाचे राजकारण येथे जास्त चालते.

Web Title: Mahilaraj 's work to the caretaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.