जिल्हा परिषदेत महिलाराजचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:40+5:302021-05-27T04:26:40+5:30
कोल्हापूर : खांदेपालटात नेत्यांकडे पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाचपैकी चार पदांसाठी महिलांचीच नावे पुढे येत असल्याने शेवटचे सात महिने ...
कोल्हापूर : खांदेपालटात नेत्यांकडे पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाचपैकी चार पदांसाठी महिलांचीच नावे पुढे येत असल्याने शेवटचे सात महिने जिल्हा परिषदेत महिलाराज येईल, असे वारे वाहत आहेत. दरम्यान, आज (गुरुवारी) सकाळी पदाधिकारी बदलासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांची बैठक संपर्क प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊसला होत आहे. तेथे शिक्षण, बांधकाम, समाजकल्याण सभापतींचा राजीनामा व नव्या दावेदारांवर चर्चा होणार आहे.
गोकुळ निकालानंतर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. काॅंग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेने आधी निर्णय घ्यावा, आमचे राजीनामे तयार आहेत, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके, विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर, खासदार संजय मंडलिक यांना महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतल्यानंतर पद मिळालेले नाही. त्यामुळे शेवटच्या वर्षात बॅकलाॅग भरुन काढण्यासाठी तीनही नेते आक्रमक झाले आहेत. सध्या शिवसेनेकडील तीन माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्या गटाकडे अनुक्रमे बांधकाम, शिक्षण आणि समाजकल्याण सभापतीपद आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद वगळता अन्य चार पदे ही शिवसेनेसह घटकपक्षांना देण्याचे आधीच निश्चित झाले आहे. त्यानुसार आता शिवसेनेने बांधकाम, शिक्षण, समाजकल्याणवर दावा केला आहे, तर अपक्ष सदस्याचा आग्रह महिला बालकल्याणसाठी आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद काॅंग्रेसकडे राहणार आहे.
चौकट
हे आहेत प्रबळ दावेदार
पक्ष व गटनिहाय पदांची वाटणी गृहित धरुन मागील वेळी ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना पदे देण्यासाठी इच्छुकांची नावे तयार केली जात आहेत. यात शिवसेनेकडून चर्चेत आलेली तीनही नावे महिलांचीच आहेत. मंडलिक गटाकडून शिवानी भोसले, आबीटकर गटाकडून वंदना जाधव तर नरके गटाकडून कोमल मिसाळ यांचे नाव आघाडीवर आहे. यातही एकमेव अपक्ष असलेल्या रसिका पाटील व काॅंग्रेसच्या सरिता खोत यांचेही नाव शर्यतीत आहे.
चौकट
पी. एन. यांना वगळून जोडण्या
राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदासाठी युवराज पाटील तर काॅंग्रेसकडून भगवान पाटील यांचे नाव आता बऱ्यापैकी चर्चेत आहे. गोकुळ निकालामुळे जिल्हा परिषदेतील राजकारणाचेही संदर्भ बदलले असून, आमदार पी. एन. पाटील गटाला बाजूला ठेवूनच उर्वरित काॅंग्रेस, राष्ट्रवादीकडून जोडण्या घातल्या जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी राहुल पाटील यांच्या नावाचा आग्रह पी. एन. पाटील यांना धरला तरी तो विषय आता मागे पडल्यातच जमा आहे.