महिपतराव बोंद्रे यांचे निधन
By Admin | Published: June 16, 2014 12:48 AM2014-06-16T00:48:44+5:302014-06-16T00:52:31+5:30
कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होते सुरू
कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील रांगडे व्यक्तिमत्त्व, श्री शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन, कृषिभूषण महिपतराव बोंद्रे (पापा) (वय ८७) यांचे आज, रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते गेले पंधरा दिवस कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांचे लहान बंधू, तर माजी महापौर सई खराडे यांचे वडील व ‘गोकुळ’चे माजी संचालक व शाहू शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत बोंद्रे यांचे ते चुलते होत.
महिपतराव बोंद्रे यांना गेली अनेक वर्षे श्वसनाचा त्रास (दमा) होता. अलीकडील सहा महिन्यांत हा त्रास वाढल्याने ते घरीच असायचे. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी पावणेचार वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी श्री शाहू शिक्षण संस्थेच्या पटांगणात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील चाहत्यांनी बोंद्रे यांचे अंत्यदर्शन घेतले. शिवाजी पेठेतून रात्री पावणेआठ वाजता अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली. रात्री आठच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, हिंदकेसरी दादू चौगले, उद्योगपती आर. एम. मोहिते, माजी महापौर शिवाजीराव कदम, विक्रम जरग आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात भारती विजयसिंह डोंगळे (घोटवडे), शामला सूर्यकांत खाडे (सांगरूळ), सरोजिनी नितीन शिंदे (पलूस), सई अजित खराडे (कोल्हापूर) या मुली तर चंद्रकांत बोंद्रे, रणजित बोंद्रे, विजय बोंद्रे, पंडितराव बोंद्रे व महादेव बोंद्रे हे पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी, (दि.१८) आहे. (प्रतिनिधी)