कडकनाथ कोंबडी पालन : ‘महारयत अॅग्रो’चे कोल्हापुरातील कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:14 PM2019-08-31T12:14:12+5:302019-08-31T12:18:21+5:30
शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो लि. या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शाहूपुरी पोलिसांनी सील केले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून सुमारे पाच तास या कार्यालयाचा पोलिसांनी पंचनामा केला.
कोल्हापूर : शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो लि. या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शाहूपुरी पोलिसांनी सील केले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून सुमारे पाच तास या कार्यालयाचा पोलिसांनी पंचनामा केला.
येथील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना या फसवणुकीच्या गुन्ह्यात साक्षीदार केले आहे. स्टेशन रोडवरील व्हीनस कॉर्नर चौकापासून हाकेच्या अंतरावरील थोरली मशीद इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर २५० स्क्वेअर फुटांचा गाळा या कंपनीने कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर घेतला होता.
‘कडकनाथ’ कोंबडी पालन व्यवसायप्रकरणी इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो लि. कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची सुमारे तीन कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपये फसवणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) व इतर संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित मोहिते यांनी कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्यालय सुरू केले होते. येथून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवर संपर्क साधून कोंबडीपालन व्यवसायाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. या फसवणुकीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.
विजय विलास आमते (वय ३९, रा. दत्त कॉलनी, सांगावकर मळा, हणमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर) यांची मुख्य तक्रार आहे. यापुढे दाखल होणाऱ्या तक्रारदारांना साक्षीदार केले जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयितांनी पलायन केले आहे. त्यांचे मोबाईलही बंद आहेत.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत थोरली मशीद इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजा उघडून ते सील केले. लोकांना पुरविले जाणारे फॉर्म, काही नोंदवही, फाइली पोलिसांच्या हाती लागल्या. तेथील शिक्के, लेटरपॅडही पोलिसांनी जप्त केले. येथील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये साक्षीदार केले. सुमारे पाच तास पंचनामा सुरू होता.