माहुलीच्या बागायतदार शेतकऱ्याला ११ लाखाचा गंडा-इन्शुरन्स कंपनीच्या नावे फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:55 PM2019-05-16T18:55:07+5:302019-05-16T19:06:11+5:30
इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या मालाड मुंबई येथील कॉर्पाेरेट कार्यालयातून जादा पैशाचे आमिष दाखवून प्रताप अण्णा कचरे (वय ५२, रा. माहुली, ता. खानापूर) या द्राक्षबागायतदार
विटा : इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या मालाड मुंबई येथील कॉर्पाेरेट कार्यालयातून जादा पैशाचे आमिष दाखवून प्रताप अण्णा कचरे (वय ५२, रा. माहुली, ता. खानापूर) या द्राक्षबागायतदार शेतकºयाची सुमारे ११ लाख १५ हजार ६५८ रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी कंपनीसह अन्य अनोळखी ठकसेनाविरुध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहुली येथील प्रताप कचरे या द्राक्षबागायतदार शेतकºयाने २०१६ ला मुंबईतील इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या कार्यालयात इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. त्यानंतर २०१८ ला कंपनीतून बोलत असल्याचा फोन अज्ञात व्यक्तीने त्यांना केला व खात्यावर ३० हजार रुपये भरण्यास कचरे यांना सांगितले. त्यावेळी कचरे यांना मिळालेल्या कंपनीच्या खाते नंबरवर त्यांनी ७० हजार रुपये भरले. त्यानंतर २५ व २६ जुलै २०१८ या कालावधित कंपनीतून आलेल्या फोननुसार २७ जुलै २०१८ रोजी पुन्हा १ लाख ७४ हजार रुपये भरले. त्यानंतर कचरे यांना, १७ लाख रुपये बोनस व रक्कम परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये तुमचे बॉन्ड खरेदी करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला २ लाख ३२ हजार ५५८ रुपये भरावे लागतील, त्यानंतर तुम्हाला वरील सर्व लाभ मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. कचरे यांनी ही रक्कमही १ डिसेंबर २०१२ रोजी भरली. त्यानंतर १४ जानेवारी २०१९ ला पुन्हा कंपनीतून कचरे यांना फोन आला. त्यावेळी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून, पुन्हा १ लाख ५८ हजार २०० रूपये भरण्यास सांगितले. ती रक्कमही कचरे यांनी कंपनीच्या खात्यात जमा केली.
त्यानंतर रक्कम जमा करण्यासाठी २ लाख १५ हजार ९०० रुपये जीएसटी भरावा लागेल असे सांगून, हा जीएसटी टप्प्या-टप्प्याने भरण्यास कचरे यांना सांगण्यात आले. ३० जानेवारी २०१९ रोजी १ लाख १५ हजार व ३१ जानेवारी २०१९ रोजी १ लाख ९०० रुपये अशी रक्कम कचरे यांनी भरली. त्यामुळे कचरे यांनी कंपनीकडे एनएफटीद्वारे ११ लाख १५ हजार ६५८ रुपये कंपनीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर कंपनीचा व्यवहार कचरे यांना संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी थेट मालाड येथील कंपनीचे कार्यालय गाठले. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी, तुमची रक्कम आमच्या कंपनीत जमा झाली नसल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे कचरे यांनी गुरुवारी विटा पोलिसांत कंपनीच्या नावे फसवणूक केल्याची तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एन. बी. सावंत पुढील तपास करीत आहेत.