पन्हाळा येथे युवतीचा खून
By admin | Published: May 18, 2016 12:36 AM2016-05-18T00:36:44+5:302016-05-18T00:44:26+5:30
अॅसिड ओतून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न
पन्हाळा : पन्हाळ्याच्या पायथ्याशी पाटाचीवाडी येथील जंगलात १८ वर्षीय युवतीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, अॅसिड ओतून चेहरा विद्रुप करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा खून ४ ते ५ दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी पाटाचीवाडी व राक्षीच्या मध्यावर ‘चुलीवरचा टेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत दुर्गम व फारसे कोणी न जाणाऱ्या ठिकाणी सोमवारी रात्री काही शिकारी मंडळी गेली असता त्यांना मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती सकाळी पोलिसांना दिली. घटनास्थळी मंगळवारी सकाळी पन्हाळा पोलिस गेले असता त्यांना एका युवतीचा अर्धनग्न व छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह दिसून आला. अॅसिड ओतून चेहरा विद्रुप केल्याने ओळख न पटण्याच्या अवस्थेतील युवतीचा अंदाजे ४ ते ५ दिवसांपूर्वी खून झालेला असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे पन्हाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी भेट देऊन तपासासाठी योग्य मार्गदर्शन केले. खुनाची माहिती समजताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.