मोर्चाचे मुख्य व्यासपीठ दसरा चौक

By admin | Published: October 9, 2016 12:09 AM2016-10-09T00:09:31+5:302016-10-09T00:46:29+5:30

मराठा क्रांती मोर्चा : गांधी मैदान, ताराराणी चौकातून होणार प्रारंभ; सुमारे ३५ लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता

The main platform of the Morcha is Dasara Chowk | मोर्चाचे मुख्य व्यासपीठ दसरा चौक

मोर्चाचे मुख्य व्यासपीठ दसरा चौक

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला होणारा मराठा क्रांती मोर्चा हा गांधी मैदान व ताराराणी चौक या दोन ठिकाणांहून सुरू होऊन त्याचे अंतिम व्यासपीठ हे दसरा चौकात करण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मोर्चामध्ये सुमारे ३५ लाख नागरिकांच्या सहभागाची शक्यता विचारात घेऊन शहराच्या उपनगरांत वेगवेगळ्या ठिकाणी खुल्या जागेत वाहने पार्किंगची सोय केली आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी पोलिस प्रशासन आणि मोर्चा कोअर कमिटीची संयुक्त बैठक शनिवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयात झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मोर्चा कोअर कमिटीच्या सदस्यांनी मोर्चा मार्ग, पार्किंगबाबत सूचना मांडल्या. अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, गृहपोलिस उपअधीक्षक सतीश माने, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, दिनकर मोहिते, तानाजी सावंत, बिपीन हसबनीस, आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
मोर्चात महिला अग्रभागी
शहरातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी गांधी मैदान हे सोयीस्कर ठिकाण ग्राह्य मानून या मोर्चात महिला, युवती व मुले अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर पुरुष सहभागी होणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले.
बैठकीत दसरा चौक आणि ताराराणी चौक निश्चितीबाबत कोअर कमिटीतील सदस्यांनी भावनिक विचार मांडले असताना, विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी, भावनिक गोष्टी बाजूला ठेवून परिस्थितीचा विचार करून सूचना मांडव्यात, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)

गांधी मैदान ऊर्जा देणारे ठिकाण
शहरातील पेठा, उपनगरे यांचे गांधी मैदान हे ऊर्जास्थान आहे. तेथून मोर्चाचा आरंभ व्हावा व दसरा चौकात त्याची सांगता व्हावी, अशी सूचना मांडून मोर्चात कमालीची शिस्त पाळली जाईल, याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.


शहरातील मार्गांची पाहणीशहरातील मार्गांची पाहणी
मोर्चाचे मुख्य व्यासपीठ दसरा चौक की ताराराणी चौक या विषयावर गेले चार दिवस पोलिस प्रशासन आणि कोअर कमिटी यांच्यात संयुक्त बैठका घेऊन विचारमंथन सुरू होते.
चार दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी दसरा चौक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण शहरातील मार्गांची पाहणी केली होती; पण दोन दिवसांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी ताराराणी चौकाचाही पर्याय पुढे केल्यानंतर मोर्चाचे अंतिम व्यासपीठ कोठे असावे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.
त्या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी शनिवारी सकाळी गांधी मैदान, दसरा चौक, ताराराणी चौक, शेंडा पार्क, आदी ठिकाणांची पाहणी केली. सायंकाळी संयुक्तबैठकीत कोअर कमिटीतील प्रमुखांनी दसरा चौकाबाबत आग्रह धरला. त्यामुळे मोर्चाचे अंतिम व्यासपीठ हे दसरा चौक निश्चित करण्यात आले.

Web Title: The main platform of the Morcha is Dasara Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.