Kolhapur: ए. एस. ट्रेडर्स प्रकरणातील मुख्य संशयित अटकेत, सापळा रचून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:51 PM2024-05-27T12:51:39+5:302024-05-27T12:52:19+5:30
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे इथल्या हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक
कोल्हापूर : बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स प्रकरणातील मुख्य फरार संशयित आरोपी दीपक बाबूराव मोहिते याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी आरे (ता. करवीर) येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
ए. एस. ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे इथल्या हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. अनेकदा त्याने पोलिसांनी गुंगारा दिला होता. तो रविवारी आरे येथील घरी आल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
संशयित मोहिते याने करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम या कंपनीत गुंतवली होती. या प्रकरणात कंपनीच्या २८ संचालकांविरोधात २५ नोव्हेंबर २०२२ रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदार, बाबूराव हजारे, विक्रम नाळे, नामदेव पाटील, अमर चौगले, सुवर्ण सरनाईक, बाळासो धनगर, बाबूराव धनगर, साहेबराव शेळके, श्रुती सावेकर, राजेश पाडळकर, रोहित रोकडे, अमित शिंदे अशा १६ जणांना यापूर्वी ताब्यात घेतले आहे.