देखभाल, दुरुस्ती हेच बनलंय दुखणं ! : चांगल्या रस्त्याची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:00 AM2019-11-16T01:00:23+5:302019-11-16T01:01:48+5:30
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प राबवित असताना ज्या भागात रस्ते केले जाणार आहेत, तेथील सेवावाहिन्या उदा. पाणीपुरवठा जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, टेलिफोन केबल, आदी रस्त्यांखालीच न ठेवता त्या स्थलांतर करणे आवश्यक होते; परंतु सेवावाहिन्या स्थलांतराचा अत्यंत मोघम उल्लेख ठेकेदार कंपनीशी झालेल्या करारात करण्यात आला
भारत चव्हाण ।
कोल्हापूर : रस्ते करताना सेवा वाहिन्या स्थलांतर करायला पाहिजे होत्या; परंतु रस्ते विकास महामंडळ, ठेकेदाराने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आता नऊ वर्षांनंतर भोगावे लागत आहेत. वारंवार होणारी खुदाई, यामुळे चांगले रस्ते उकरले जात आहेत. देखभाल, दुरुस्ती हेच आता या रस्त्यांचे मुख्य दुखणं बनले आहे.
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प राबवित असताना ज्या भागात रस्ते केले जाणार आहेत, तेथील सेवावाहिन्या उदा. पाणीपुरवठा जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, टेलिफोन केबल, आदी रस्त्यांखालीच न ठेवता त्या स्थलांतर करणे आवश्यक होते; परंतु सेवावाहिन्या स्थलांतराचा अत्यंत मोघम उल्लेख ठेकेदार कंपनीशी झालेल्या करारात करण्यात आला. ‘अडथळा ठरत असतील तर सेवावाहिन्या स्थलांतर कराव्यात’ असा उल्लेख नंतर करण्यात आला; त्यामुळे सेवावाहिन्या तशाच रस्त्याच्या खाली राहिल्या. सिमेंटच्या रस्त्याखाली पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या दबल्या जाऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांना गळती लागली आहे.
जलवाहिनीची गळती काढण्यासाठी महानगरपालिकेला वारंवार खुदाई करावी लागत आहे. हॉकी स्टेडियमपासून इंदिरा सागर चौकाकडे जाणाºया रस्त्यावर पाच ते सहा ठिकाणी गळती लागलेली होती. ती काढण्याकरिता ब्रेकर भाड्याने घेऊन कामे करावी लागली. सिमेंटचे रस्ते फोडले आणि गळती काढली; पण त्यामुळे मूळ रस्ता खराब होऊन आता त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. डांबरीकरणाने पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो फसला आहे. त्या ठिकाणचे खड्डेच पडले आहेत.
इंदिरासागर हॉल ते सायबर चौक हा शहरातील सर्वांत मोठा तसेच मोठ्या रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी सेवावाहिन्यांकरिता खुदाई झालेली पाहायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथ व त्याखालून पावसाचे पाणी वाहण्यासाठी गटर आहेत; पण त्याची देखभाल, दुरुस्ती न झाल्यामुळे सुंदर रस्त्यांना अवकळा प्राप्त झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कंपौंडला लागून अनेक ठिकाणी शेणाचे ढीग लावून ठेवले आहेत. फूटपाथवर गवत, झाडे-झुडपे उगवली आहेत. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. पावसाचे पाणी वाहून नेणा-या गटारींची भोके दगडांनी बुजविल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. शेंडा पार्क चौकात अनेक वर्षांपासून गळती असून, ती दूर करण्यात अपयश आले आहे; त्यामुळे तेथील रस्ता कायम पाण्यात असल्याने खराब झाला आहे.
राधानगरी रस्ता अरुंद झाल्याचा पश्चात्ताप
रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका, क्रशर चौक, सानेगुरुजी, आपटेनगर ते पुईखडी हा रस्ता विकास प्रकल्पातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता मूळ आराखड्यात ९० फुटांचा होता; मात्र प्रत्यक्ष रस्ते करताना तो ६० फुटांचाच करण्यात आला. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. कारण या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक आहे. एखादी केएमटीची बस थांबली की मागची सर्व वाहने थांबून राहतात. वाहतुकीला त्यामुळे अडथळा होत आहे. या रस्त्याचे दुसरे दुखणे म्हणजे ठेकेदाराने पुईखडीपासून क्रशर चौकापर्यंतच रस्ता केला. तेथून पुढे रंकाळा टॉवरपर्यंतचा रस्ता अर्धवट टाकून दिला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिका प्रशासनाने हा रस्ता केला; पण तोही दर्जा आणि गुणवत्तेला छेद देणारा आहे.
आपटेनगरपासून क्रशर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाईपलाईन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी खुदाई झाली, पण पॅचवर्कची कामे नीट झाली नसल्याने ती पुन्हा उखडली आहेत. रस्त्याखालून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे, त्यावर ठिकठिकाणी चेंबर करून त्यावर झाकणे टाकली आहेत. ही झाकणे रस्त्याची पातळी सोडून खाली दबली गेली आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार या खड्ड्यात आदळतात. तसे अपघातही अनेक झाले आहेत.
- फुलेवाडी रस्ता डोकेदुखी ठरतोय : जावळाचा गणपती ते फुलेवाडी जकात नाका हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. आजूबाजूची खेडी तसेच कोकणात जाणारी वाहतूक या रस्त्यावर प्रचंड आहे; त्यामुळे तो अरुंद वाटायला लागलेला आहे. रस्ता करताना पुरेशी काळजी घेतली गेली नसल्यामुळे वाहनांच्या तुलनेत रस्ता अपुरा पडताना पाहायला मिळतो. या रस्त्यावर फुलेवाडी दत्तमंदिर, पेट्रोल पंप, डी मार्ट अशा तीन ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. डी. मार्टसमोर तर वाहतुकीची कोंडी हा नेहमीचा प्रश्न आहे. खराब रस्ता हेच वाहतुकीच्या कोंडीला कारणीभूत आहे.