बहुमत आमच्याकडेच
By Admin | Published: March 14, 2017 12:39 AM2017-03-14T00:39:08+5:302017-03-14T00:39:08+5:30
दोन्ही कॉँग्रेसचा दावा : ‘पी.एन.’-मुश्रीफ-सतेज पाटील बैठक
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर आमच्याकडेच असल्याचा दावा कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केला. जिल्हा परिषदेमधील सत्तेची गोळाबेरीज करण्यासाठी उभय नेत्यांची कोल्हापुरात बैठक झाली. यामध्ये संख्याबळाची सविस्तर चर्चा करण्यात आली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘भाजता’सह मित्रपक्षांचे संख्याबळ ४० पर्यंत पोहोचले असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच अध्यक्ष होणार, असा दावा रविवारी केला होता. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेस पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची सोमवारी सकाळी कोल्हापुरात बैठक झाली. यामध्ये पंचायत समित्यांमधील दोन्ही कॉँग्रेसचे संख्याबळ आजमावण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत चंद्रकांतदादांना ‘चमत्कार’ घडवू न देण्याचा निर्धार या नेत्यांनी केला. दोन्ही कॉँग्रेस एकत्र येऊन पंचायत समित्यांमध्ये कोणाची मदत घ्यायची या विषयीही चर्चा झाली.
जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या दाव्याबाबत चर्चा करून कोण कोणाबरोबर जाऊ शकते, याचीही अटकळ उभय नेत्यांनी बांधली. सत्तेसाठी टोकाचा संघर्ष झाला तर आपल्या बरोबर कोण राहू शकते, याची चाचपणीही यावेळी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याची व्यूहरचना या नेत्यांनी यावेळी केली.
जोडण्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर
शिवसेनेसह इतर स्थानिक आघाड्यांबाबत चर्चा करण्याची जबाबदारी बैठकीत सतेज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर पाटील यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या.
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस इतरांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करणार यात कोणतीही शंका नाही. त्यासाठी आमची बैठक झाली. यामध्ये सत्ता स्थापनेची व्यूहरचना ठरविण्यात आली.
- आमदार सतेज पाटील
पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेबाबत आढावा घेतला. कोणी कितीही चमत्काराची भाषा केली तरी जिल्हा परिषदेवर सत्ता आमचीच येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे.
- आमदार हसन मुश्रीफ