Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 18:30 IST2023-01-12T18:30:13+5:302023-01-12T18:30:56+5:30
मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही सरपंच-उपसरपंच विरोधी गटाचा

Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे
शशिकांत भोसले
सेनापती कापशी : करड्याळ (ता. कागल) येथे लोकनियुक्त सरपंच प्रियांका प्रकाश पाटील यांनी २ मतांचा वापर केल्याने उपसरपंचपदी समरजित घाटगे गटाचे कृष्णात आण्णासो कुंभार यांची निवड झाली. मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही उपसरपंच विरोधी गटाचा झाला.
निवडणुकीत मुश्रीफ गटाच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे चार व समरजित घाटगे - संजय मंडलिक - संजय घाटगे गटाच्या भावेश्वरी परिवर्तन आघाडीचे तीन सदस्य निवडून आले. लोकनियुक्त सरपंचपदी भावेश्वरी आघाडीच्या प्रियांका पाटील निवडून आल्या.
आज उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मुश्रीफ गटाकडून दत्तात्रय बाळासो कामते व भावेश्र्वरी आघाडीकडून कृष्णात आण्णासो कुंभार यांनी अर्ज दाखल केले. दोघांनाही समसमान चार मते पडली. यावेळी सरपंच पाटील यांनी दोन मतांचा वापर केल्याने उपसरपंचपदी समरजित घाटगे गटाचेच कृष्णात कुंभार यांचा एका मताने विजय झाला. ग्रामपंचायतीवर मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही उपसरपंच देखील विरोधी गटाचाच झाला.
यावेळी प्रकाश पाटील, शिवाजी गेंगे, बळीराम कुंभार, शिवाजी कुंभार, सुरेश गेंगे आदीसह सर्व प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर कुंभार समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.