भारत राखीव बटालियनसाठी जागा उपलब्ध करु
By admin | Published: February 8, 2016 01:04 AM2016-02-08T01:04:58+5:302016-02-08T01:11:37+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर
कोल्हापूर : भारत राखीव बटालियन-३ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्णांत १०० एकर भूखंड उपलब्ध न झाल्याने हा बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी शासनाला पाठविला आहे. त्यावर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बटालियन कोल्हापूरातचं स्थापन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी प्रस्ताव सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जागेअभावी बटालियन अहमदनगरकडे हलवू नये, आम्ही कोल्हापूर जिल्ह्णांत जागा उपलब्ध करुन घेवू अशी विनंती मुखमंत्र्यांना केली.
राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या जागेवरील ‘वनसंज्ञा’ रद्द करण्याची प्रक्रिया खूप किचकट व वेळखाऊ असल्याने तेथील प्रस्ताव रद्द करून ‘वनसंज्ञा’ लागू नसलेल्या आणि गटनिर्मितीस योग्य जागेचा शोध जिल्ह्यात घेतला असता रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित केली होती.
या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई २९ डिसेंबर २०१५ रोजी कोल्हापुरात आले होते. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. परंतु ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध केला. या बैठकीचा निर्णय बिष्णोई यांनी पोलीस महासंचालक दिक्षीत यांना पत्राद्वारे कळविला. त्यावर दिक्षीत यांनी जागे अभावी बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. शासनाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही.
मुखमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आल्यामुळे पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना प्रस्ताव घेवून तात्काळ बोलवून घेतले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव मुखमंत्र्यांना दिला. यावेळी मंत्री पाटील यांनी अहमदनगरला हे बटालियन हलवू नये, आम्ही लवकरचं बटालियनसाठी कोल्हापूरात जागा उपलब्ध करुन घेतो, अशी विनंती मुखमंत्र्यांना केली.
बटालियनचे कर्मचारी दौंडला रवाना
बटालियनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार हे ६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना आज, सोमवारपासून बटालियनचा मुक्काम दौंडला हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बटालियनचे सर्व अधिकारी व कर्मचारी रविवारी सकाळीच दौंडला रवाना झाले.
राधानगरी-अकिवाट येथील जागा अपुरी
बटालियनसाठी १०० एकर जागेची आवश्यक्ता आहे. राधानगरी व अकिवाट (शिरोळ) येथील ग्रामस्थांनीही ग्रामसभेत हा तळ उभारणीसाठी ६० एकर जागा देण्याचा ठराव केला आहे. ही जागा बटालियनसाठी अपुरी आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुढाकार घेणार आहेत.