भाजपचा ‘महापौर’ करा, बंगला बांधू : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:32 AM2018-05-27T00:32:08+5:302018-05-27T00:32:08+5:30
भाजपचा महापौर करा, त्यांच्यासाठी महिन्यात बंगला बांधू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली. हरित इमारत संकल्पनेतून
कोल्हापूर : भाजपचा महापौर करा, त्यांच्यासाठी महिन्यात बंगला बांधू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली. हरित इमारत संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या १२ कक्षाच्या अद्ययावत विश्रामगृहाच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही ग्वाही दिली. शुक्रवारीच झालेली महापौर निवडणूक, त्यात भाजपला आलेले अपयश या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा झाली.
या विश्रामगृहाचे मंत्री पाटील यांच्या हस्ते सायंकाळी उद्घाटन झाले. त्यानंतर विश्रामगृहाची त्यांनी पाहणी केली. एका कक्षात बसल्यावर महापालिकेचे स्थायी सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विलास वास्कर, राजसिंह शेळके हे तिथे आले. मंत्री पाटील यांनी त्यांना महापालिकेतर्फे अशी एखादी चांगली इमारत बांधा, अशी सूचना केली. त्यावर ढवळे यांनी महापालिकेकडे त्यासाठी एवढा निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावर मंत्री पाटील यांनी महापालिकेत भाजपचा महापौर करा, आपण त्यांच्यासाठी आलिशान बंगला बांधू असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ताराबाई पार्कात शासकीय विश्रामगृह येथील परिसरात ४ कोटी ८४ लाख रुपये खर्चून १२ कक्ष असलेले नवीन विश्रामगृह उभारण्यात आले आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमल महाडिक, स्थायी सभापती ढवळे, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश माने, उपअभियंता बी. एम. उगले, आदी प्रमुख उपस्थित होते.
हरित इमारत संकल्पनेवर हे विश्रामगृह उभारण्यात आले असून, तळमजल्यावर ४ कक्ष, भोजन कक्ष, स्वयंपाकगृह, पहिल्या मजल्यावर ४ कक्ष व परिषद कक्ष, दुसऱ्या मजल्यावर ४ कक्ष असे एकूण १२ अद्ययावत कक्ष आहेत. यामुळे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींची निवासाची सोय उपलब्ध झाली असल्याचे अधीक्षक अभियंता साळुंखे यांनी सांगितले.पणनचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जिल्हा समन्वयक विजय जाधव, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, उपअभियंता अविनाश पोळ, आदी उपस्थित होते.
ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उभारलेल्या नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केले. यावेळी विलास वास्कर, विजय जाधव, बाबा देसाई, आमदार अमल महाडिक, सदाशिव साळुंखे, आदी उपस्थित होते.