शिराळा नागपंचमीबाबत कायद्यात बदल करा
By admin | Published: August 6, 2015 12:45 AM2015-08-06T00:45:32+5:302015-08-06T00:47:13+5:30
सुधीर मुनगंटीवार : केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन
शिराळा : शिराळ्याच्या नागपंचमीबाबत कायद्यात बदल करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुंबईत मंत्रालयात नागपंचमीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत दिली. यावेळी विधानपरिषद माजी सभापती शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीबाबत बोलताना शिवाजीराव देशमुख म्हणाले की, नागपंचमी हा सण अनेक शतकांपासून साजरा होत आहे. यावर्षीची नागपंचमी न्यायालयाचा मान राखून व शिराळकरांची भावना समजूून घेऊन कशी साजरी करता येईल व शासकीय यंत्रणा हा सण साजरा करण्यासाठी कशी मदत करेल, अशी अपेक्षित चर्चा बैठकीत झाली. नागपंचमी सणाबाबत कायमचा तोडगा कसा काढता येईल, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. त्यासाठी उच्चस्तरीय बैठक राज्य व केंद्रीय अधिकाऱ्यांबरोबर घ्यावी, अशी मागणी आम्ही केली.
शिवाजीराव नाईक म्हणाले की, जावडेकर यांच्यासोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची नागपंचमी उत्सवाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असून, त्यामध्ये कायद्यात बदल करण्याबाबतची विनंती आम्ही करणार आहे. यावर्षी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागपंचमी शांततेत साजरी करावी.
मानसिंगराव नाईक म्हणाले की, यावर्षीचा नागपंचमी उत्सव न्यायालयाचा मान राखत साजरी करूया व पुढील वर्षापासून नागपंचमीस गतवैभव मिळावे म्हणून केंद्राकडे पाठपुराव्यासाठी प्रयत्न करू.
यावेळी मुख्य वन सचिव विकास खारगे, मुख्य वनसंरक्षक राव, सरपंच गजानन सोनटक्के, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, प्रमोद नाईक, पं. स. सदस्य लालासाहेब तांबीट, अभिजित नाईक, प्रजित यादव, केदार नलवडे, सुनील कवडेकर, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा वनअधिकारी समाधान चव्हाण, प्रांताधिकारी विजयराव देशमुख उपस्थित होते. (वार्ताहर)