महापालिकेला ढपलामुक्त करू
By admin | Published: October 21, 2015 12:34 AM2015-10-21T00:34:37+5:302015-10-21T00:40:50+5:30
चंद्रकांतदादा पाटील : वैशाली पसारे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कोल्हापूर : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वहित जोपासल्याने गेल्या दहा वर्षांत शहराचा विकास रखडला आहे. एकीकडे शेकडो कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा पोकळ दावा होत असताना शहरवासीयांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
प्रभाग क्रमांक ३७, राजारामपुरी-तवनाप्पा पाटणे हायस्कूल या प्रभागातील भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवार वैशाली पसारे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, शहराच्या विकासकामांचा गवगवा करायचा आणि प्रत्येक विकासकामात ढपला पाडायचा, ही प्रवृत्ती गेल्या दहा वर्षांतील आहे. त्याचा बीमोड करण्यासाठी भाजप-ताराराणी महायुतीच्या हाती महापालिकेची सत्ता द्या.
याप्रसंगी वैशाली अमित पसारे, माणिकराव पाटील-चुयेकर, दिलीप मेत्राणी, सुषमा गर्दे, सुमया तिरूडकर, बाबूराव कांबळे, अमित पसारे, तेजस्विनी हराळे, यशवंत कांबळे, सुमित पारखे, आदी उपस्थित होते.