विम्याच्या ३५ कोटींसाठी मृत्यूचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 01:17 AM2016-03-11T01:17:05+5:302016-03-11T01:18:05+5:30

मृत गडहिंग्लजचा : जळीत कारप्रकरणी बिल्डर अमोल पवार, भाऊ विनायकसह दोघांना अटक

Make death for 35 crores of insurance | विम्याच्या ३५ कोटींसाठी मृत्यूचा बनाव

विम्याच्या ३५ कोटींसाठी मृत्यूचा बनाव

Next

कोल्हापूर : विम्याचा ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणारा कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक संशयित अमोल जयवंत पवार (वय ३१, रा. अपराध कॉलनी, साने गुरुजी वसाहत) व त्याचा भाऊ विनायक (३५) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आजरा-आंबोली मार्गावर झालेल्या चारचाकी गाडीच्या अपघाताचा छडा अवघ्या १२ दिवसांत पोलिसांनी लावला.
या गाडीमध्ये मृत झालेला गडहिंग्लज येथील रमेश कृष्णाप्पा नाईक (१९) या तरुणाचा संशयितांनी गळा आवळून खून केला व डिझेलने गाडी पेटवून दिली होती. बांधकाम व्यवसायामधून कर्ज झाल्याने संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ या दोघांनी हे कृत्य केले, अशी माहिती गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील पाचगाव-गिरगाव माळावर उचगावमधील एकाचा पुण्यातील गुंड लहू ढेकणे यानेसुद्धा स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला होता. ढेकणे याचाही पर्दाफाश करून त्यालाही कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. याबाबत प्रदीप देशपांडे म्हणाले, २९ फेबु्रवारी २०१६ रोजी आजरा ते आंबोली जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मी पुलाखालील ओढ्यामध्ये कारचा अपघात झाला होता. त्यामध्ये कार पूर्णपणे जळालेल्या स्थितीत तसेच चालकाची कवटी व हाडे शिल्लक राहिली होती. हा प्रकार समजताच गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील व आजरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मिरधे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यावेळी मृताची ओळख पटत नव्हती. सागर पाटील यांनी घटनेची पोलिस दप्तरी प्रथम अपघात म्हणून नोंद केली. तपासामध्ये जळालेल्या गाडीचा क्रमांक एमएच ०९ बीएक्स ७७१० असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) मदत घेऊन या गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता त्यामध्ये ही गाडी अमोल पवार याची निष्पन्न झाली.
दरम्यान, गडहिंग्लज पोलिस ठाण्यात रमेश कृष्णाप्पा नाईक हा बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी नाईकच्या घरातील व्यक्तींनी एक बांधकाम व्यावसायिक रमेशकडे आला होता, असे सांगितले. त्याप्रमाणे प्राथमिक तपास केला असता अमोल पवार हा मृत नसून जिवंत असल्याचे निष्पन्न झाले.
अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक हे दोघे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी या व्यवसायाकरिता वेगवेगळ्या बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकार यांच्याकडून मोठ्या रकमेची उचल केली होती. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ३५ कोटी रुपयांची अशी मोठी विमा पॉलिसी काढली होती.
हा गुन्हा उलगडण्यासाठी साहाय्यक निरीक्षक विकास जाधव, रमेश खुणे, रवींद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित, सुशील वंजारी, मिरधे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल यशवंत उपराटे, शिवाजी खोराटे, प्रशांत माने, संजय हुंबे, संजय कुंभार, जितेंद्र भोसले, प्रकाश संकपाळ, संजय काशीद, राजेंद्र निगडे यांनी मदत केली.यावेळी पत्रकार परिषदेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी,उपअधीक्षक डॉ. सागर पाटील उपस्थित होते.


घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा घातपात असल्याचा संशय सर्वप्रथम बळावला. त्यानुसार आम्ही हाडे व कवटी तपासासाठी मिरज येथे पाठविली. त्यामध्ये सुमारे १९ ते २० वर्षांच्या तरुणाची ही हाडे व कवटी असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिला. त्यानुसार पुणे येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे डीएनए तपासण्यासाठी ही हाडे व कवटी पाठविण्यात आली. त्याचा अहवाल तत्काळ या प्रयोगशाळेकडून प्राप्त केला.
-डॉ. सागर पाटील, उपअधीक्षक, गडहिंग्लज विभाग.

अमोल व विनायक पवार या दोघांना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा, मृताचा डीएनए चाचणी अहवाल असे विविध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- दिनकर मोहिते, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर.


अमोलची गडहिंग्लज, आजरा परिसरात टेहळणी
आजरा, गडहिंग्लज या परिसरात अमोल पवार हा २० ते २५ फेबु्रवारी या काळात सावज शोधण्यासाठी फिरत होता. त्याने खुदाईकाम करण्यासाठी तीन ते चारजणांना विचारले; पण त्यांना संशय आल्याने ते आले नाहीत. त्यानंतर अमोल पवार याला गडहिंग्लजमधील रमेश नाईक भेटला. त्याने एक दिवसासाठी १७०० रुपये देतो असे सांगून त्याला तेथून घेऊन गेला.


असा केला घात... रमेश नाईक याला अमोल याने कारमधून उत्तूर (ता. आजरा) येथे घेऊन आला. तेथे असलेल्या विनायकला घेऊन हे तिघेजण आजरा-आंबोली मार्गावर गेले. त्या ठिकाणी रमेश नाईक याचा प्रथम दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोघांनी नाईक याची कपडे बदलून त्याला अमोल पवारची कपडे, त्याचे घड्याळ घातले. त्यानंतर ते लक्ष्मी पुलाखालील ओढ्यामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी गाडीसह मृत रमेश नाईकला ओढ्यात ढकलून दिले. त्यानंतर खाली जाऊन दोघांनी गाडीचे बॉनेट उघडून इंजिनवर, रमेश नाईकवर व गाडीतील सीटवर डिझेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर दोघे तेथून पसार झाले व पुढे अमोल पवार हा बेळगाव, बंगलोर, चेन्नई, पुडुचेरी, कोची या भागांत राहिला.


चार लाख ९६ हजारांचा पहिला हप्ता
संशयित अमोल पवार याने २६ फेबु्रवारी २०१६ रोजी ३५ कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली. त्यानुसार पवारने वैद्यकीय तपासण्या करून त्याचे प्रमाणपत्र विमा पॉलिसीला जोडले. त्यासाठी पहिला हप्ता म्हणून अमोलने चार लाख ९६ हजार रुपये भरले आहेत.

Web Title: Make death for 35 crores of insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.