गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडे करा
By admin | Published: May 25, 2016 01:01 AM2016-05-25T01:01:02+5:302016-05-25T01:01:21+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पाऊस नसला तरी यंत्रणा सज्ज; १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत
कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गावपातळीवर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी येथे दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चालू वर्र्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिक सक्षम ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, ‘सर्व यंत्रणांनी आपापल्या विभागांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म आराखडे तत्काळ तयार करावेत. १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या कालावधीत मुख्यालय सोडू नये. जिल्ह्णात सर्वसाधारणपणे १२९ गावे पूरबाधित होतात. या गावांत सर्व विभागांनी नोडल आॅफिसर यांची नेमणूक करावी. शोध व बचाव पथके आणि आवश्यक साहित्य अद्ययावत ठेवण्यात यावे.
कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय स्वतंत्र नोडल आॅफिसर नेमावा. दैनंदिन पाणीसाठे, विसर्ग, पर्जन्यमान यांचे नियोजन करावे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणेही इतकेच महत्त्वाचे आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव या जिल्ह्णांमध्ये पूरपरिस्थितीत पाणी सोडण्याचे नियोजन समन्वयाने व्हावे, या दृष्टीने या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केली.
कोल्हापूर पद्धतीच्या
बंधाऱ्यांची दुरुस्ती
जिल्ह्णात २८२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यांची दुरुस्ती होणे महत्त्वाचे असून त्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ आराखडा तयार करून त्याबाबत पाठपुरावा करावा, अशी सूचना सैनी यांनी केली. विविध शासकीय योजनांतून बांधलेल्या बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
पर्यायी मार्ग तयार ठेवा
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध झालेल्या सर्व साहित्याची तपासणी करून मॉकड्रिल घेण्याची सूचना करून जिल्हाधिकारी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार ठेवावेत. तेथील रस्ते पाण्याखाली गेल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांच्या सुटकेसाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे.
भूस्खलन गावांचा सर्व्हे
भूस्खलनाबाबत नियोजन करा. भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या गावांचा सर्व्हे करा. डोंगराळ भागात याबाबतची विशेष खबरदारी घ्या. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवा. यामध्ये गॅसकटर, जेसीबी, पोहणारे यांच्या संपर्कयाद्या तयार कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक
नियंत्रण कक्षाचा १०७७ हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक असे : ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६२२९५३ असे आहेत. पोलिस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी १०० तसेच ०२३१-२६६२३३३ हा क्रमांक उपलब्ध आहे.
अशी आहेत तालुकानिहाय १२९ पूरबाधित गावे : शिरोळ : ३८, करवीर : २३, हातकणंगले : २०, पन्हाळा : १२, कागल व राधानगरी प्रत्येकी : ११, गगनबावडा ०७, शाहूवाडी : ०५, भुदरगड ०३.