'‘मेक इन कोल्हापूर’चे स्वप्न पूर्ण करणार
By Admin | Published: February 6, 2015 12:25 AM2015-02-06T00:25:55+5:302015-02-06T00:42:26+5:30
दिनेश बुधले, चंद्रकांत जाधव : विरोधकांचा दुटप्पीपणा; उद्यम सोसायटी निवडणूक
कोल्हापूर : कल्पकता, विश्वास, सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर आम्हाला ‘मेक इन कोल्हापूर’चे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सभासदांच्या पाठबळावर विकासाभिमुख कामकाज करून कोल्हापूर उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा लौकिक वाढवायचा आहे. त्यातून सभासदांच्या प्रगतीला चालना दिली जाईल, अशी ग्वाही राजर्षी शाहू प्रेरित सत्तारूढ-युवा उद्योजक पॅनेलच्या दिनेश बुधले व चंद्रकांत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बुधले म्हणाले, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, होतकरू उद्योजकांनी ५७ वर्षांपूर्वी सोसायटीची स्थापना केली. पारदर्शी आणि यशस्वीपणे काम करून सोसायटीचे जतन केले आहे. औषधांचे दुकान, वजनकाटा, सेसा-गोवाची एजन्सी, सांस्कृतिक सभागृह, नवीन औद्योगिक वसाहत, पाण्याची सुविधा विद्यमान कार्यकारिणीने पुरविली आहे. सभासदांच्या समस्या, प्रश्न आवर्जून जाणून घेतले जातात.
त्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तरे दिली आहेत. शिवाय त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली जाते. निव्वळ गाळे आणि वीज न पुरविता उद्योग निर्मितीसाठी योजना राबवून ‘मेक इन कोल्हापूर’चे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत.
जाधव म्हणाले, ज्यांना तीनवेळा सभासदांनी नाकारले, ज्यांचे सभासदत्व संस्थेच्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्याचा निर्णय सभासदांनी घेतला, असे विरोधक हे आता सत्ताधाऱ्यांना सभासद वैतागले, असा आरोप करीत आहेत. एकीकडे विद्यमान कार्यकारिणीवर आरोप करावयाचे आणि दुसरीकडे यातील एका संचालकांना आपल्या पॅनेलमध्ये घ्यावयाचे हे कितपत योग्य आहे. अशा दुटप्पी विरोधकांना सभासद योग्य जागा दाखवतील.
निवडणूक लढविण्यासाठी पॅनेल तयार करताना उमेदवार मिळविताना ज्यांच्या नाकीनऊ आले, असे विरोधक सभासदाभिमुख कामकाज काय करणार? त्यामुळे सभासदांना सोबत घेऊन, त्यांच्या विश्वासाने आम्हाला वाटचाल करून संस्थेचा लौकिक वाढवायचा आहे. (प्रतिनिधी)
आम्ही हे करणार...
४नवीन औद्योगिक वसाहतीतील प्लॉटस्चे दुसऱ्या फेजमध्ये वाटप करणार ४शिवाजी उद्यमनगरमध्ये कायमस्वरूपी प्रदर्शन हॉल बांधणार ४सभासद, कामगारांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा पुरविणार ४कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार ४रस्ते, पथदिवे, गटर्स या पायाभूत सुविधांची पूर्तता करणार ४वाय. पी. पोवारनगरमध्ये सुरक्षारक्षकांची व्यवस्था करणार