निवडणूक बिनविरोध करा!

By admin | Published: March 14, 2016 12:26 AM2016-03-14T00:26:24+5:302016-03-14T00:31:49+5:30

‘गडहिंग्लज’ कारखाना : नलवडेप्रेमींच्या निर्धार मेळाव्यात सतेज पाटील यांचे आवाहन

Make the election uncontested! | निवडणूक बिनविरोध करा!

निवडणूक बिनविरोध करा!

Next

गडहिंग्लज : शेतकरी आणि तालुक्याच्या भल्यासाठी गडहिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करा आणि विधायकतेचा नवा आदर्श राज्यासमोर ठेवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केले.
गडहिंग्लज कारखान्याचे संस्थापक दिवंगत आप्पासाहेब नलवडे यांचे सुपुत्र व कारखान्याचे माजी संचालक संग्रामसिंह नलवडे यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्यात’ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज तालुका काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर होते.
आमदार पाटील म्हणाले, स्व. नलवडे यांनी आपली राजकीय पुण्याई वापरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याची उभारणी केली. मात्र, दुर्दैवाने तो आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यातून बाहेर काढून कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी संग्रामसिंह यांना पाठबळ द्या.
नलवडे म्हणाले, कंपनीला कारखाना चालवायला देण्यास आपला विरोध नव्हता. मात्र, ‘त्या’ करारास आपला विरोध होता. वार्षिक सभेत आपण आपला विरोध नोंदविला. मात्र, त्या सभेत मूग गिळून गप्प बसलेली मंडळीच आज कंपनीला विरोधाचे नाटक करीत आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच आपण निवडणूक बिनविरोधाचा प्रस्ताव दिला आहे. चारित्र्यसंपन्न व होतकरू कार्यकर्ते आमच्यासोबत द्या, पाच वर्षांत कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा करतो,
अशी ग्वाहीदेखील नलवडेंनी यावेळी दिली.
प्रारंभी आमदार पाटील यांना म. दु. श्रेष्ठी विद्यालयापासून मिरवणुकीने वाजत-गाजत मेळाव्याच्या ठिकाणी बॅ. नाथ पै विद्यालयापर्यंत आणण्यात आले. मेळाव्यास शशिकांत खोत, सोमगोंडा आरबोेळे, भैरू पाटील, तात्यासाहेब देसाई, विद्याधर गुरबे, संजय बटकडली, अजित बंदी आदींसह नलवडेप्रेमी उपस्थित होते.
प्रशांत देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी संचालक सुरेश बटकडली व बाबूराव गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. अरविंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. जोतिराम केसरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


नलवडे यांनी केले जाहीर : ‘आघाडी’बाबत ‘सतेज’ यांना सर्वाधिकार
माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक बिनविरोध करण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यातूनही लढायचे ठरल्यास ‘नलवडे पॅनेल’ म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मात्र, आपल्यात खूप ‘छकले’ पडले आहेत. त्यामुळे ‘युती-आघाडी’ करण्यासंबंधीचे सर्वाधिकार सतेज पाटील यांना देत आहे, असेही नलवडेंनी जाहीर केले.
‘कोऱ्या स्टॅम्प’वर सही घेतली
संस्थापकांचा मुलगा म्हणून कारखाना वाचवण्यासाठी संग्रामसिंह यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना शेतकऱ्यांनी पाठबळ द्यावे, आपणही ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही देतानाच त्यांनी ‘गडहिंग्लज’ सोडू नये म्हणून शंभर रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्पवर त्यांची सही घेतली आहे, असे सतेज यांनी सांगितले. संग्रामसिंह यांनी शेतकऱ्यांना अभिवादन करून त्यास सहमती दर्शवली.
सत्तांतरात हस्तक्षेप केला नाही
सत्तांतरावेळी काही मंडळी आपल्याकडे आली होती. हस्तक्षेप नको म्हणून आपण लक्ष घातले नाही. मात्र, आता सभासद व तालुक्याचा स्वाभिमान जागवण्यासाठी आलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, योग्य प्रस्ताव आल्यास त्यास मान्यता देऊन अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहील आणि लढायचे ठरल्यास ताकदीने पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही सतेज यांनी यावेळी दिली.
‘आई’ अजूनही सभासद नाही
संस्थापकांच्या पत्नी आणि माझी आई अजूनही कारखान्याची सभासद नाही. नऊ भावंडांपैकी पाचजण कारखान्याचे सभासद नाहीत. कारखाना आपल्याच ताब्यात राहावा, अशी भावना असती तर संस्थापकांनी आपल्या घराण्यातील सर्वांना सभासद करून टाकले असते, असेही संग्रामसिंह यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Make the election uncontested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.