हेवेदावे बाजूला ठेवून हेल्पर्सला अजून मोठी करा; समजूतदारपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 07:06 PM2020-07-29T19:06:32+5:302020-07-29T19:10:33+5:30

व्यक्ती, कुटुंब, समाज असो अथवा संस्था; तिथे मतभेद निर्माण होतातच; परंतु म्हणून त्यातून काही चुकीचे घडून कोणत्याही चांगल्या चाललेल्या संस्थेच्या हिताला गालबोट लागू नये, अशीच भावना हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड संस्थेच्या वादावर समाजातून व्यक्त होत आहे.

Make the helpers even bigger by putting aside the claims; The need for understanding | हेवेदावे बाजूला ठेवून हेल्पर्सला अजून मोठी करा; समजूतदारपणाची गरज

हा आहे हहेल्पर्सचा खरा परिवार... तो असाच कायम हसत-खेळत बहरला पाहिजे.

Next
ठळक मुद्दे हेवेदावे बाजूला ठेवून हेल्पर्सला अजून मोठी करा; समजूतदारपणाची गरज अपंगांच्या जीवनातील माय टिकली पाहिजे

विश्वास पाटील

कोल्हापूर : व्यक्ती, कुटुंब, समाज असो अथवा संस्था; तिथे मतभेद निर्माण होतातच; परंतु म्हणून त्यातून काही चुकीचे घडून कोणत्याही चांगल्या चाललेल्या संस्थेच्या हिताला गालबोट लागू नये, अशीच भावना हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड संस्थेच्या वादावर समाजातून व्यक्त होत आहे. या संस्थेतून अध्यक्षा नसिमा हुरजूक यांनी राजीनामा दिला आहे. तिथे आता नवे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

अपंग कल्याणाच्या क्षेत्रात आईच्या मायेने काम करणारी ही संस्था आहे. आजपर्यंतची तिची वाटचाल अत्यंत पारदर्शी आणि अपंगांचे अश्रू पुसणारी झाली आहे. याच कामाचे महत्त्व मोठे आहे आणि ते कोणत्याही वादापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, याचे भान संस्थेतील सर्वच जाणत्या मंडळींनी ठेवायला हवे.

हल्ली मानवाधिकारांपासून ते अंध, अपंग, निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी, किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकजण अशा संस्था काढत आहेत. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांची वानवा आहे. म्हणूनच हेल्पर्ससारख्या संस्थांचे मोठेपण नजरेत भरणारे आहे. त्या मोठेपणाला तडा लागू नये. हुरजूक असोत की पी. डी. देशपांडे; ही हेल्पर्सची दोन चाके आहेत.

बँकेतील उत्तम पगाराची व पदाची अजून १५ वर्षे शिल्लक असलेली नोकरी पी. डी. देशपांडे यांनी संस्थेसाठी सोडून दिली. कारण त्यांना व्यक्तिगत आयुष्यापेक्षा संस्थेचे आयुष्य मोठे वाटले. सख्ख्या बहीण-भावांमध्येही जेवढे आपुलकीचे नाते नसेल असे नाते गेली ३५ वर्षे दीदी आणि पी.डी. यांच्या जीवनात तयार झाले आहे.

असे असताना प्रगल्भतेने एकमेकांना सांभाळून, सावरून पुढे घेऊन जाण्याच्या काळात त्यांच्यात कटुता तयार व्हावी, हेच संस्थेची आतापर्यंतची वाटचाल पाहणाऱ्यांसाठी वेदनादायी ठरत आहे. समाज भरभरून तुमच्या पाठीशी राहिला आहे; म्हणूनच ह्यहेल्पर्सह्णची आतापर्यंतची वाटचाल देदीप्यमान झाली आहे. यापुढेही ही वाटचाल अशीच व्हायची असेल तर सर्वांनीच अधिक समूजदारपणा दाखविण्याची गरज आहे.

देशपातळीवर दखलपात्र काम

संस्थेला उचगाव (ता. करवीर) येथील हद्दीत राज्य शासनाकडून दोन एकर जागा मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी मदत झाली आहे. संस्था फक्त अपंगांसाठी वसतिगृह चालवीत नाही. पराकोटीचे अपंगत्व आलेल्या मुलांना जगण्यासाठी लायक बनविण्याचे अत्यंत मोलाचे काम संस्था आतापर्यंत निरपेक्षपणे करीत आली आहे.

आतापर्यंत १६ हजार अपंगांचे जीवन संस्थेने फुलविले आहे. भारतात आज अपंग कल्याणाच्या क्षेत्रातील पहिल्या पाच संस्थांची नावे कुणी काढली तरी त्यांमध्ये हेल्पर्सचा समावेश होतो, एवढे चांगले काम या संस्थेने उभे केले आहे.

हे आहे विश्वस्त मंडळ

  • नसिमा हुरजूक- अध्यक्ष (१६ जून २०२० ला राजीनामा)
  • पी. डी. देशपांडे : उपाध्यक्ष व संघटक
  • मनोहर देशभ्रतार-सचिव
  • श्रीकांत केकडे - सहसचिव
  • अभिजित गारे - खजानिस (कोल्हापूर अर्बन बँकेत नोकरी)
  • तेजश्री शिंदे- विश्वस्त (महापालिकेत अधिकारी)
  • डॉ. छाया देसाई- विश्वस्त (महापालिकेत वैद्यकीय अधिकारी)
  • सुचेत्रा मोर्डेकर : विश्वस्त (संगीत क्षेत्रातील जाणकार)
  • सुशील नाशिककर- विश्वस्त (इंजिनिअर)
  • नंदकुमार मोरे - विश्वस्त (इंजिनिअर)
  • सुबोध मुंगळे- विश्वस्त-कार्यकर्ता व पेंटिंग कंत्राटदार


ही सर्व मंडळी हेल्पर्सच्या कामाशी गेली २५ वर्षे जोडलेली असून त्यांतील पाचजण अपंग आहेत.

हेल्पर्सचे अर्थकारण

जनरल बॉडी सदस्य : ५०

  • राज्य सरकारकडून अनुदान : ०५ टक्के (एकूण २५ पैकी आठ शिक्षकांच्या पगाराची रक्कम)
  • विदेशी निधी देणगी स्वरूपात : ०६ टक्के
  • संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या उद्योगांतून : २९ टक्के
  • देशांतर्गत देणग्या : ६० टक्के
  • संस्थेची वार्षिक उलाढाल - ३.५ कोटी
  • हेल्पर्सचा स्टाफ - १६०
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोरे-वाडोस (ता. कुडाळ) येथे देणगीतून मिळालेल्या १२ एकर जागेवर काजू प्रक्रिया प्रकल्प


हुरजूक यांना त्रास व्हावा यासाठीच आमच्यावर आरोप

उचगाव (ता. करवीर) येथील संस्थेच्या समर्थ मंदिर शाळेच्या समोरच आम्ही जून २०१६ ला १३ लाख ६४ हजार रुपये खर्चून सव्वापाच गुंठे जमीन खरेदी केली. त्यावर बांधकाम पूर्ण झाले आहे. ही सगळी रक्कम माझ्या म्हाकवे (ता. कागल) येथील वडिलोपार्जित शेतातून मिळाळेल्या उत्पन्नातून दिली आहे. माझ्या नावे सव्वाचार गुंठे व मधुताई पाटील यांच्या नावे एक गुंठा जमीन असल्याचे स्पष्टीकरण हेल्पर्सच्या काजू प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापक साताराम पाटील यांनी केले आहे.

मी व मधुताई पाटील हे दीदींचे डावे-उजवे हात आहोत, आम्हांवर आरोप करून दीदींना खिळखिळे करण्याचा काहींचा डाव असल्याचे साताराम पाटील यांचे म्हणणे आहे. आम्ही केलेल्या व्यवहाराचे सर्व पुरावे ७ ऑक्टोबर २०१८ ला विश्वस्त मंडळाला दिले आहेत; परंतु त्यांना ते न पाहता माघारी आरोप करण्यात जास्त रस आहे, असे त्यांंनी म्हटले आहे.

 

Web Title: Make the helpers even bigger by putting aside the claims; The need for understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.