बस दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करु : चंद्रकांतदादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 06:14 PM2017-10-02T18:14:04+5:302017-10-02T18:17:31+5:30
कोल्हापूर : पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेतील जखमींची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णांची विचारपूस केली, तसेच दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तानाजी साठे व सुजय अवघडे या दोघांच्या राजारामपूरीतील निवासस्थानी दुपारी भेट देऊन त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे सात्वन केले. दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व दोषीवर कारवाई केली जाईल असे आश्वासन मंत्री पाटील यांनी नातेवाईक आणि परिसरातील नागरीकांना दिले.
गंगावेश मार्गावर ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घसल्याने तानाजी साठे आणि सुजय अवघडे यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन कुटूंबांचे सात्वन केले.
यावेळी साठे व अवघडे कुटूंबियांच्या नातेवाईकांनी व नागरीकांनी या घटनेची चौकशी करावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी चंद्रकांतदादा यांना परिसरातील संतप्त नागरीकांनी घेरावा घालून प्रश्नांचा भडीमार केला.
त्यावेळी मंत्री पाटील यांनी, या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय विसर्जन मिरवणुक सुरु असताना या मार्गावरील केएमटीसह अवजड वाहतूक बंद का केली नाही याबाबत उच्चस्तरीय चौकशी करु, तसेच सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या दुर्घटनेत कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्यांना रोजगारभिमूख पाटबळ देण्याची कारवाई तातडीने करण्यात येईल असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पो. नि. संजय साळुंखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई आदी उपस्थित होते.
शासकिय मदतीसाठीही प्रयत्न
सोमवारी सकाळी मंत्री पाटील यांनी अॅष्टरआधार, सीटी हॉस्पीटल तसेच सीपीआर रुग्णालयात जाऊन बस दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. त्यावेळी जखमींना औषधोपचारासाठी एकही रुपया खर्च करु देणार नाही, आवश्यक वाटल्यास जखमींवर मुंबईतील नामवंत हॉस्पीटलमध्ये उपचार करु असेही आवश्वासन मंत्री पाटील यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिले.
महापालिकेच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ तर जखमींच्या नातेवाईकांना १ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे तरीही शासनाच्यावतीने मदत देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
महाडीक, आवळें यांचीही भेट
सोमवारी सकाळी आमदार अमल महाडिक यांनी सीपीआर रुग्णालयात बस दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तर माजी आमदार राजीव आवळे यांनी या दुर्घटनेतील मृत झालेल्या तानाजी साठे व सुजय अवघडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.