तातडीने पण वस्तुनिष्ठ पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:09+5:302021-07-29T04:26:09+5:30
कोल्हापूर गेल्यावेळच्या महापुराच्या पंचनाम्यावरून अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने पण वस्तुनिष्ठ पंचनामे करा अशा सूचना ...
कोल्हापूर गेल्यावेळच्या महापुराच्या पंचनाम्यावरून अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने पण वस्तुनिष्ठ पंचनामे करा अशा सूचना जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिल्या. ज्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे ते पंचनाम्यात दिसले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्या बुधवारी बैठका घेण्यात आल्या. तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे. म्हणून कोणाच्या सांगण्यावरून कसे तरी न करता आपण बांधिल आहोत हे समजून घेऊन पंचनामे करा अशा सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळच्या तहसीलदार डॉ. अर्पणा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवतिके, हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी यावेळी विविध सूचना केल्या.
महापूर ओसरायला सुरुवात झाल्याने स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देण्याची सूचना पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी दिल्या. नागरिक टप्प्याटप्प्याने स्वच्छता करताना गल्लीत कचरा आणून ठेवणार; परंतु तो ग्रामपंचायतीने उचलणे आवश्यक आहे. महापुरानंतर कोणतीही आजाराची साथ उद्भवू नये यासाठी पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेला प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले.
२८्७२०२१ कोल शिरोळ बैठक
शिरोळ तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांच्या बैठकीत बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून शंकर कवतिके, विकास खरात, डॉ. अर्पणा मोरे धुमाळ उपस्थित होत्या.