कोल्हापुरातील ‘त्या’ व्यापाऱ्याचा अपहरण की बनाव

By admin | Published: April 1, 2017 07:04 PM2017-04-01T19:04:32+5:302017-04-01T19:04:32+5:30

ठावठिकाणा नाही : पोलिस संभ्रमावस्थेत : गडहिंग्लजच्या व्यापाऱ्याकडे कसून चौकशी

Make a kidnapping of 'those' merchants in Kolhapur | कोल्हापुरातील ‘त्या’ व्यापाऱ्याचा अपहरण की बनाव

कोल्हापुरातील ‘त्या’ व्यापाऱ्याचा अपहरण की बनाव

Next

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : वसुली झालेले २८ लाख रुपये काढून घेण्यासाठी अपहरण झालेले खाद्यतेलाचे कोल्हापुरातील व्यापारी सौरभ बाळासाहेब शिंदे (वय ३०, रा. माजगावकरनगर, फुलेवाडी) यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.

या प्रकरणी पोलिसांनी गडहिंग्लज येथील अर्जुन रिफायनरीजचे मालक संशयित संतोष वसंत शिंदे (३६) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शनिवारी दिवसभर चौकशी केली असता अपहरण प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमके अपहरण केले कोणी? का हा बनाव आहे, या संभ्रमावस्थेत पोलिस आहेत.

पोलिसांनी सेल्समन राजकुमार शिगेहोळी (रा. सुतारमळा, कोल्हापूर), इचलकरंजी येथील व्यापारी, मावसभाऊ अमर देवेकर, सौरभची पत्नी स्नेहा, आई संगीता शिंदे यांच्याकडे कसून चौकशी केली. राजेश शामराव चिखलकर (५०, रा. लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी, फुलेवाडी) यांनी गडहिंग्लज येथील अर्जुन रिफायनरीज नावाने दुकान असलेल्या होलसेल खाद्यतेलाचे व्यापारी संतोष शिंदे यांनी २८ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेण्यासाठी भाचा सौरभ शिंदे याचे इतर साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संतोष शिंदे याला ताब्यात घेतले. सौरभ हा संतोष यांच्याकडून होलसेलमध्ये तेलाचे डबे आणून इतर व्यापाऱ्यांना विक्री करीत असे. अपहरणानंतर शनिवारी सकाळी त्याचा नातेवाइकाच्या मोबाईलवर फोन आला. त्यानंतर तो बंद झाला. आम्ही कसोशीने त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. संशयित संतोष शिंदेचा जबाब सौरभ शिंदे हा मूळचा कडगाव गावचा असून आमच्या भावकीतला आहे. त्याची-माझी जानेवारी २०१७ मध्ये ओळख झाली. तो कमिशनवर माझ्याकडून होलसेल तेलाचे डबे घेऊन जात असे. त्याबदली अ‍ॅडव्हान्स धनादेश देऊन नंतर बिल देत असे. त्याचा व्यवहार चांगला होता. चार दिवसांपूर्वी तो तेलाचे डबे घेऊन गेला. त्याचे बिल ५ लाख ५५ हजार रुपये झाले. दि. ३० मार्च रोजी त्याने मला त्या रकमेचा धनादेश दिला. तो शुक्रवारी (दि. ३१) गडहिंग्लज येथील ‘अपना बँके’त भरला. सायंकाळी पाचच्या सुमारास तो न वटल्याचा संदेश मोबाईलवर आला. त्यानंतर सौरभशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

मी व्यवसायासाठी अपना बँक, गडहिंग्लज शाखेतून सतरा कोटींचे कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते मी नियमित भरतो. सौरभ जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासमोर बसून राहतो. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना माझी नाहक बदनामी केली आहे. त्याच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असा कबुलीजबाब संतोष शिंदे याने पोलिसांना दिला.

पोलिस त्याने कट रचून इतर साथीदारांच्या मदतीने अपहरण केले आहे का? या दृष्टीनेही तपास करीत आहेत. संशयास्पद हालचाली मावसभाऊ अमर प्रकाश देवेकर याच्या मोबाईलवर एस.एम.एस. आले, ‘मला यू.पी.ला घेऊन चाललेत. माझे २८ लाखही काढून घेतलते. माझी गाडी लक्ष्मीपुरीमध्ये आहे. बोल पटकन काय करू?अर्जुनने गेम केलाय माझा.’ असे सलग पाच एस. एम. एस. आले. त्यावरून पोलिसांनी सौरभ शिंदेचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो यू.पी.मध्ये नसून मुंबईत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या गाडीचा शोध घेतला असता ती लक्ष्मीपुरीमध्ये नसल्याची खात्री झाली.

सौरभने दिलेला ५ लाख ५५ हजार रुपयांचा धनादेश संतोषने त्याच दिवशी शुक्रवारी गडहिंग्लज येथील बँकेत भरला. तो न वटल्याचा संदेश सायंकाळी पाचच्या सुमारास आला. त्यानंतर साडेसातच्या सुमारास सौरभच्या मोबाईलवरून मावसभाऊ अमर देवेकर याच्या मोबाईलवर अपहरण झाल्याचे संदेश आले.

पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास संतोष शिंदे याला घरातून ताब्यात घेतले. संतोषकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये कुठेही संशयास्पद माहिती आढळून आलेली नाही. सौरभ शिंदे याचे साने गुरुजी बसस्टॉपसमोरील अर्बन बँकेत खाते आहे. तो रोज पैसे भरण्यासाठी तिथे जात असे. अपहरण झाले त्या दिवशी तो बँकेत फिरकलाच नाही. दुसऱ्या व्यापाऱ्याकडून वसुली केली असली तरी इतकी मोठी उधारी नाही. त्यामुळे त्याच्याकडे २८ लाख रुपये आले कोठून? नेमके अपहरण केले कोणी? का तो बनाव आहे? अशा संभ्रमावस्थेत पोलिस आहेत. सौरभ शिंदे हा कर्जबाजारी आहे का? त्या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Make a kidnapping of 'those' merchants in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.