राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मेळावा यशस्वी करा
By admin | Published: September 11, 2014 12:20 AM2014-09-11T00:20:57+5:302014-09-11T00:22:34+5:30
हसन मुश्रीफ : गांधी मैदानावरील मेळाव्यास एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा मंगळवारी (दि. १६) होणारा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, बुधवारी केले. गांधी मैदानावर एक लाख कार्यकर्त्यांच्या उपस्थित या मेळाव्याचे नियोजन केले असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा प्रचार प्रारंभ मंगळवारी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर हे राष्ट्रवादीचे स्थापनेचे शहर आहे, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या शहरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा मनोदय पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आहे. कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांच्या प्रचाराचा प्रारंभ येथे होणार असल्याने मेळाव्यासाठी किमान एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
खा. धनंजय महाडिक म्हणाले, केंद्रात आघाडी सरकारने केलेल्या कामाच्या मार्केटिंगमध्ये कमी पडल्याने लोकसभेला पीछेहाट झाली. आता चूक सुधारून सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत.
आर. के. पोवार यांनी स्वागत केले. आमदार के. पी. पाटील, अरुण इंगवले, मधुकर जांभळे, किशन चौगले, रामराजे कुपेकर, शिवानंद माळी, आप्पासाहेब धनवडे, पद्मा तिवले, मदन कारंडे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, प्रदीप पाटील, नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेवराव भोईटे, आशाकाकी माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंगेजखान पठाण, भैया माने, मानसिंगराव गायकवाड, बाबासाहेब पाटील, संगीता खाडे, अनिल साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हसन मुश्रीफ : पी. एन. पाटील यांच्यावर टीका
रडत बसण्याचा आमचा स्वभाव नाही
पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस एकमेकांचे शत्रू असले तरी सध्या ती परिस्थिती नाही. काँग्रेस संपत चालली आहे, राष्ट्रवादीही अडचणीत असून अशावेळी छोट्या-मोठ्या कारणांसाठी भांडत बसलो तर दोघेही अडचणीत येऊ, याचे भान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ठेवावे. रडत बसण्याचा आमचा स्वभाव नसल्याचा टोला जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. कोल्हापूर उत्तर, शिरोळसह करवीर मतदारसंघांवर यावेळी त्यांनी दावा केला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ए. वाय. पाटील काहीतरी बोलले म्हणून पी. एन. पाटील चिडले. त्यानंतर ‘ए. वाय.’ यांनी खुलासाही केला तरीही पी. एन. पाटील शांत होत नाहीत. काँग्रेस संपत चालली आहे, राष्ट्रवादी अडचणीत असताना दोघेही छोट्या-मोठ्या कारणासाठी भांडत बसून चालणार नाही. पी. एन. पाटील यांनीच आपणाला शिवसेनेत जाण्यास सांगितले, शिवसेनेत गेलो तरी ‘गोकुळ’ची उमेदवारी आपल्या पत्नीलाही मिळणार असल्याचे संजय घाटगे जाहीर सभेत सांगत आहेत. याबाबत आम्ही पी. एन. पाटील यांच्यावर कधी बोललो नाही. के. पी. पाटील यांच्या विरोधात बजरंग देसाई उभे राहणार आहेत, भरमूअण्णा पाटील यांना जिल्हा नियोजन निधीमधून एक कोटीचा निधी दिला. ते उद्या कुपेकरांच्या विरोधात उभे राहणार आहेत. याबद्दल आम्ही ओरड केली काय? ए. वाय. पाटील यांच्या एखाद्या विधानावर सारखे बोलायचे हे योग्य नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
स्
‘भोगावती’मुळे वेदना
‘पी. एन.’ यांच्या सांगण्यावरून हर्षवर्धन पाटील यांनी भोगावती कारखान्याची चौकशी लावली आहे. निवडणुकीच्या तोंडावर काय गरज होती? त्यामुळे वेदना झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
आवाज घुमला पाहिजे
‘उत्तर’ व ‘शिरोळ’ची जागा मागायची म्हणता तर पवारसाहेबांच्या समोर त्या तालुक्यांचा आवाज घुमला पाहिजे. इच्छुकांच्या नावांचा जयघोष झाला तरच साहेब उमेदवारीबाबत गांभीर्याने घेतील, असा चिमटा मंत्री मुश्रीफ यांनी इच्छुकांना काढला.
आम्ही फक्त वाजंत्रीच!
हातकणंगले तालुक्यातून गाजत-वाजत तीन हजार कार्यकर्ते आणण्याची तयारी अरुण इंगवले यांनी दर्शवली. त्यामध्ये हस्तक्षेप करत तुम्ही व आम्ही फक्त आयुष्यभर वाजंत्रीच राहायचे, असा टोला मानसिंगराव गायकवाड यांनी नेत्यांना लगावला.
आमच्या अंगात उशिरा येते
निवडणूक अंगात आल्याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये जोश येत नसल्याचे सांगत कागल मतदारसंघात अगोदरच अंगात येते पण आमच्या व चंदगडच्या कार्यकर्त्यांच्या अंगात जरा उशिरा येते. त्यामुळे माणसे आणायची जबाबदारी कागलने घ्यावी, असे के. पी. पाटील यांनी सांगितले.