मुश्रीफ यांच्या नार्को टेस्टचा आदेश काढावा
By admin | Published: May 17, 2015 01:10 AM2015-05-17T01:10:22+5:302015-05-17T01:10:22+5:30
राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : हसन मुश्रीफ यांच्यामुळेच जिल्हा बँक रसातळाला; नार्को टेस्ट झाल्यास गैरव्यवहार बाहेर येईल
कोल्हापूर : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भ्रष्टाचारामुळे रसातळाला गेली आहे. त्यास आमदार हसन मुश्रीफ जबाबदार आहेत. मुुश्रीफ यांनी स्वत: नार्को टेस्टला तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मुश्रीफ यांच्या नार्को टेस्टसंबंधी आदेश त्वरित काढून सहकार्य करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गेले आठवडाभर आमदार मुश्रीफ व खासदार शेट्टी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातूनच शनिवारी खासदार शेट्टी यांनी नार्को टेस्टसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
पत्रात म्हटले आहे, बँकेने २० गुंठे जमिनीवर ३२ लाख, तर ४० गुंठ्यांवर ६८ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. ही कर्जे केंद्र सरकारच्या २००८ च्या कर्जमाफीत माफही झालेली आहेत. कागल शाखेत २ कोटी ८६ लाख रुपयांची शिल्लक रक्कम गायब झालेली आहे. क्षमता नसतानाही टक्केवारीसाठी कर्जाचे वाटप केले. बुडित, अवसायनातील, आजारी सहकारी संस्था सिक्युरिटी अॅक्टखाली लिलावात काढण्यात आल्या. त्या संस्थांच्या महत्त्वाच्या जागा कमी किमतीमध्ये देण्यात आल्या. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.
गैरव्यवहारामुळेच बँकेवर प्रशासन नेमण्याची वेळ आली. बँकेची सहकार कायदा ‘कलम ८८’अंतर्गत चौकशी सुरू आहे. नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा ठपका तत्कालीन संचालकांवर आहे. हसन मुश्रीफ यांना ५ कोटी ३४ लाख रुपये भरण्याची नोटीस काढण्यात आली आहे. माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनीही मुश्रीफ यांनीच बँक रसातळाला नेल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधीचे सर्व पुरावे माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांच्याकडे दिल्याचा दावाही मंडलिक यांनी केला होता.
चांगली बँक म्हणून ख्याती असलेली बँक रसातळाला जाण्यास मुश्रीफांचा कारभारच कारणीभूत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुश्रीफ यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होती. नार्को टेस्ट झाल्यास बँकेतील गैरव्यवहार बाहेर येईल, असे वाटते. मी नार्को स्टेट करण्याची केलेली मागणी त्वरीत मुश्रीफ यांनी मान्य केली आहे. मुश्रीफ म्हणतात, ‘मी अतिशय सज्जन आहे. असे धंदे कधीही केलेले नाहीत. माझी नार्को टेस्टसाठी तयारी आहे. मीच ही मागणी पहिल्यांदा केली होती.’
दरम्यान, मुश्रीफ यांनी मला मोठ्या मनाने माफ केल्याचे वृत्तपत्रांतून कळाले. नार्को टेस्ट झाल्याशिवाय त्यांच्यावरील बालंट दूर होणार नाही. आमदार मुश्रीफ हे संत तुकारामांसारखे भोळे-भाबडे आहेत, असे काही लोक म्हणतात. मग मीच मंबाजी आहे का? असे मला वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांची नार्काे टेस्ट करावीच.