बालकामगार कायद्यातील सकारात्मक दुरुस्ती करा
By admin | Published: May 16, 2015 12:12 AM2015-05-16T00:12:20+5:302015-05-16T00:14:52+5:30
स्वाभिमानी बालहक्क अभियानाची मागणी : उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन
कोल्हापूर : बालकामगार कायद्यातील सकारात्मक दुरुस्ती व्हावी आणि शिक्षण हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी स्वाभिमानी बालहक्क अभियानच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी स्वीकारले.
देशातील बालकामगारांची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी बालकामगार कायद्यात सकारात्मक दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाने बालकामगारांचे वय १८ वरून १४ पर्यंत खाली आणले. शिक्षण हक्क व काल अधिनियम कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच शिक्षण हक्क कायद्याच्या काटेकोरपणे ६ ते १४ या वयोगटांतील अंमलबजावणी व्हावी तसेच बालकामगार काायदा दुरुस्ती करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मतदान, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाहाची मान्यता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मान्यता मिळते तर मग बालकामगारांचे वयदेखील १८ वर्ष असणे आवश्यक आहे. १८ वरून १४ वय करण्याचा शासनाचा हेतू संशयास्पद दिसत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बदलामुळे मुलांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करू नये, मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण सरकारमुळे मिळते त्यामुळे धोकादायक व बिगर धोकादायक अशी उद्योगाची विषमता करू नये, शिक्षण हकक कायदा ६ ते १८ वर्षे वयोगटापर्यंत करण्यात यावा, अशा सूचनाही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदन देण्यासाठी भेटलेल्या शिष्टमंडळात अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, जैनुद्दीन पन्हाळकर, सुलभा माने, शरयू भोसले, सुनीता भोसले, वनिता कांबळे, अमोल कवाळे, मनिषा पोटे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)