लाकूड पासचे अधिकार तालुक्याला देण्याचा प्रस्ताव तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:21 AM2020-12-09T04:21:03+5:302020-12-09T04:21:03+5:30
कोल्हापूर : आठ घनमीटर इमारती आणि १०० घनमीटर लाकडाचा पास देण्याचे अधिकार जिल्हा पातळीपेक्षा तालुका ...
कोल्हापूर : आठ घनमीटर इमारती आणि १०० घनमीटर लाकडाचा पास देण्याचे अधिकार जिल्हा पातळीपेक्षा तालुका पातळीवर वनक्षेत्रपाल यांना देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना वनमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या प्रकरणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने मंगळवारी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर जिल्हयातील लाकूड ठेकेदार व वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक पार पडली. आठ घनमीटर इमारती व १०० घनमीटर लहान लाकूड (जळाऊ) वाहतूक पास परवाना सध्या जिल्हास्तरावर उपवनसंरक्षक यांच्या पातळीवर आहे. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब होतो. त्यामुळे लाकूड व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे. यानंतर तालुका पातळीवर अधिकारी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक राम बाबू यांना देण्यात आली.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, केंद्र शासनाने घोषित केलेल्या इको झोनमध्ये समाविष्ट असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील वृक्षतोड करण्यास परवानगी देण्याबाबत ६ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. कोल्हापूर जिल्ह्याकरिता वृक्षतोड करण्याकरिता आवश्यक असणारी पास सुविधा ई-पास सुविधा सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्य प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीस, सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अन्य वरिष्ठ अधिकारी, बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, संघटनेचे संतोष मेंगाणे, सागर देसाई, राजेंद्र सुतार, अरुण देसाई, आनंदा पिळणकर, रमेश बचाटे, जगदीश पाटील, प्रवीण तांबेकर उपस्थित होते.