गोफण तयार, योग्यवेळी दगड भिरकावणार
By admin | Published: February 26, 2017 01:01 AM2017-02-26T01:01:51+5:302017-02-26T01:01:51+5:30
सदाभाऊ खोत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुही वाढणार
कोल्हापूर : वेळ आलीच तर कोणते खत, कोणते बियाणे वापरावे याची जाण आहे; कोणत्या पाखरांना कसे हाणायचे त्याचीही माहिती आहे. पिकांवर येणाऱ्या पाखरांना हाणण्यासाठी गोफण तयार आहे, ती भिरकावण्यासाठी सज्ज आहे, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिला. त्यामुळे संघटनेतील दुही व त्यांचे संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबरचे संबंध दुरावल्याचे मानले जात आहे.
खासदार शेट्टी यांनी सदाभाऊंच्या घराणेशाहीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शिवाय त्यांचा मुलगा सागर याच्या बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील (जि. सांगली) ते प्रचारासाठीही फिरकले नाहीत; त्यामुळे त्याचा निसटता पराभव झाला. हा पराभव सदाभाऊंच्या फारच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २४) ही त्यांनी सांगलीत बोलताना शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘तुमची तत्त्वे तुम्हांला लखलाभ होवोत. सागरच्या पराभवाने शेट्टी यांना आत्मिक समाधान मिळाले असेल,’ अशी टीकाही त्यांनी केली होती. तोपर्यंत शनिवारी त्यांनी पुन्हा टीका करून संघटनेपासून दूर जात असल्याचेच संकेत दिले.
तत्त्वांचा बुरखा पांघरून फार दिवस राजकारण करता येत नाही, असा वार करीत सदाभाऊंनी खासदार शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. शेट्टी यांनी जर आपल्या मुलाचा प्रचार केला असता तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगत सागर खोत यांच्या निसटत्या पराभवाबद्दल खोत यांनी खंत व्यक्त केली. राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांबाबत अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या अभ्यासाचा सरकारला, शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याचे सदाभाऊंनी नमूद केले. झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताकदीने काम करीन. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांचे नेतृत्व शेतकरी करील. मी कुणाच्या आरोपांची पर्वा करीत नाही, असेही सदाभाऊ यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
——————-
हिटलर वाचण्याची इच्छा नाही
‘मी आयुष्यात गांधी वाचला आहे. हिटलर वाचण्याची कधी इच्छाच झाली नाही. व्यक्तिस्वातंत्र्य द्या, ही महात्मा गांधी यांची शिकवण आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले पाहिजे. प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. त्यामुळे सल्लागार कोण आहेत हे नेतृत्त्वाने पाहावे. मला वेगळे काही करायचं नाही. आम्ही दोघे जिवलग मित्र आहोत. मतभेद होते ते लपवण्याचे काही कारण नाही. मात्र टोकाचे मतभेद नाहीत,’ असाही निर्वाळा सदाभाऊंनी दिला.
——————
माझा मुलगा चळवळीतून पुढे आला. नवे नेतृत्व तयार व्हावे म्हणून निवडणूक लढविली; परंतु जनतेने दिलेला कौल मान्य आहे. मुलाच्या पराभवाची जबाबदारी मान्य करतो.
- सदाभाऊ खोत
कृषी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते.