कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांची अचानक तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:47+5:302021-04-16T04:23:47+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा ग्रामीण भागातील रुग्ण आल्यानंतर बेड नसल्याचे सांगितले जाते. परंतु वस्तुस्थितीमध्ये बेड ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा ग्रामीण भागातील रुग्ण आल्यानंतर बेड नसल्याचे सांगितले जाते. परंतु वस्तुस्थितीमध्ये बेड उपलब्ध असतात. रुग्णांची अडवणूक करणाऱ्या आणि आर्थिक त्रास देणाऱ्या या रुग्णालयांची अचानक तपासणी केली जावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या आरोग्य समितीमध्ये करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सदस्यांच्या भावना लेखी कळविण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते.
ऑनलाईन झालेल्या या बैठकीत समिती सदस्य सविता राजाराम भाटले, सुनीता रेडेकर, पुष्पा वसंत आळतेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोरे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सभापती पाटील म्हणाले, कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्या रुग्णाला कोविड काळजी केंद्रामध्ये दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये अशा केंद्राची उभारणी करा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी अलगीकरण करण्यात यावे. या रुग्णांची रोज ऑक्सिजन तपासणी, थर्मल तपासणी करण्यात यावी. तसेच असे रुग्ण इतरत्र फिरणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
सुपर स्प्रेडरची रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात यावी. सर्वेक्षणाचे काम प्रभावी करण्यात यावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची तपासणी करावी. रुग्ण बाधित आल्यानंतर सहवासित शोध गांभीर्याने करावा. प्रत्येक रुग्णामागे किमान २० सहवासीतांच्या कोविड चाचण्या कराव्यात.
चौकट -
प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेडचे केंद्र उभे करा
यावेळी सभापती पाटील यांनी तालुका पातळीवर केवळ ऑक्सिजन बेडचे कोविड काळजी केंद्र उभारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सर्वसाधारण कोविड काळजी केंद्र आणि ऑक्सिजन बेड असलेले काळजी केंद्र स्वतंत्र करा. प्रत्येक तालुक्याला असे केंद्र उभारल्याने किमान त्यांना घरचे जेवण देता येईल आणि शहरावरील ताण कमी येईल, असे पाटील म्हणाले. जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हा परिषद आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अशी केंद्रे उभारावीत, असे आवाहन त्यांनी केले.