गांधीनगरातील भाजीविक्रेत्यांना वेळ ठरवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:26+5:302021-04-09T04:24:26+5:30

गांधीनगर : गांधीनगर भाजी मंडईतील भाजीविक्रेत्यांना दिवसभर भाजी विकण्याची परवानगी न देता त्यांना सकाळी सहा ते दुपारी ...

Make time for vegetable sellers in Gandhinagar | गांधीनगरातील भाजीविक्रेत्यांना वेळ ठरवून द्या

गांधीनगरातील भाजीविक्रेत्यांना वेळ ठरवून द्या

Next

गांधीनगर : गांधीनगर भाजी मंडईतील भाजीविक्रेत्यांना दिवसभर भाजी विकण्याची परवानगी न देता त्यांना सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेतच भाजीपाला विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजी मंडईतील स्थानिक रहिवाशांनी ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गांधीनगरच्या भाजी मंडईत अनेक भाजीविक्रेते सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाजी विकण्यास बसतात. त्यांचे साहित्यही विकण्याच्या ठिकाणीच ठेवून जातात. परिणामी बरॅक नंबर १७४ व १७६ मधील स्थानिक रहिवाशांच्या मुलांना खेळण्यासाठी जागाच मिळत नाही. तसेच दिवसभराचा कचरा न काढल्यामुळे तो साठून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीविक्रेत्यांमुळे रुग्णवाहिका किंवा एखादे चारचाकी वाहन रहिवाशांच्या दारात येण्यास अडचणी निर्माण होत आहे. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंतच त्यांना भाजी विक्री करण्यास परवानगी दिली होती; पण सध्या काही विक्रेते सकाळपासून रात्रीपर्यंत भाजी विकण्यासाठी ठाण मांडून असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा भाजीविक्रेत्यांना वेळेचे बंधन घालावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायत प्रशासनास केली आहे. ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी संबंधित भाजीविक्रेते व स्थानिक रहिवासी यांची बैठक बोलावून योग्य तो तोडगा काढला जाईल असे सांगितले. यावेळी सरपंच रितू लालवानी, जानकीबाई कालानी, दीपा कालानी ,आकाश राजानी, मुकेश राजानी, सुदर्शन साधवानी, हरेश सज्नांनी, नारायण संजानी, सरस्वती संजानी उपस्थित होते.

फोटो : ०८ गांधीनगर भाजीमंडई

ओळ- गांधीनगरच्या भाजीविक्रेत्यांना वेळेचे बंधन घालून स्थानिक रहिवाशांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी सरपंच रितू लालवानी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Make time for vegetable sellers in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.