चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:25+5:302021-06-02T04:20:25+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील चंदगड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचा मार्ग ...
राम मगदूम
गडहिंग्लज : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील चंदगड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचा मार्ग मोकळा झाला. पाटणे फाट्यानजीक हलकर्णी एमआयडीसीतील चार एकर जागा या सेंटरसाठी मिळाली आहे. त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असणारे ७० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
सन २०१३ मध्ये तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर, तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या प्रयत्नाने या सेंटरला मान्यता मिळाली. परंतु, त्यासाठी निवडलेल्या पाटणे पाट्यावरील या जागेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.
कर्नाटक आणि कोकणला जोडणाऱ्या या महामार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी सध्या बेळगाव-गडहिंग्लजला आणावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अत्यवस्थ रुग्ण वाटेतच दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अत्यवस्थ रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावेत, म्हणूनच चंदगडच्या जनतेचा या सेंटरसाठी आग्रह होता.
चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे.
-----------------------------------
* नाममात्र दराने मिळाली जागा
३ मार्च २०१७ रोजी हलकर्णी एमआयडीसीमधील १६ हजार चौरस मीटर जागा या सेंटरसाठी देण्याची तयारी औद्योगिक विकास महामंडळाने दाखविली होती. परंतु, त्यासाठी २५ लाख ३५ हजार रुपये भरावे लागणार होते. त्यासाठी शासनाकडून निधी मिळाला नाही. दरम्यान, सुधारित दरानुसार जागेसाठी तब्बल ४२ लाख रुपये भरावे लागणार होते. परंतु, जनतेच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या या सेंटरसाठी ही जागा विनाशुल्क किंवा नाममात्र एक रुपया दराने मिळावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती. त्याला खास बाब म्हणून मान्यता मिळाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दवाखान्याच्या उभारणीसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
-----------------------------------
*
‘लोकमत'ने उठविला होता आवाज
सन ६ जुलै २०२० रोजीच्या अंकात ‘पाटणे उपजिल्हा रुग्णालय निधीअभावी रखडले’ या मथळ्याखालील वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने या प्रश्नी आवाज उठविला होता. त्याची नोंद घेऊन औद्योगिक विकास महामंडळाने नाममात्र दराने ही जागा या रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली.
-----------------------------------
* फोटो : ०१०६२०२१-गड-१०
* फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील पाटणे फाटानजीक येथील नियोजित रुग्णालयाच्या हलकर्णी एमआयडीसीतील जागेच्या पाहणीनंतर आमदार राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, डॉ. सुहास साने, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०१०६२०२१-गड-११