रिक्षाचालकांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:22+5:302021-05-20T04:27:22+5:30
कोल्हापूर : राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
कोल्हापूर : राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठीचे ॲप आयसीआयसीआय बँकेने तयार केले असून त्याचे ऑनलाईन सादरीकरण शुक्रवारी (दि.२१) ला होणार आहे. प्रत्यक्षात शनिवारी (२२) पासून रिक्षाचालकांना या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती बुधवारी रात्री प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील लाखो परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोना काळात मदतीचा हात म्हणून प्रत्येकी १५०० रुपये खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले; परंतु प्रत्यक्षात मदत वाटपासाठीचे ॲपच अजून तयार झाले नसल्याने ही मदत हवेतच राहिली होती. यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व शिवसेनाप्रणीत रिक्षा संघटना थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे बुधवारी ई-मेलद्वारे पाठपुरावा केला. त्यास अनुसरून रात्री कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयास ॲपबाबतचे स्पष्ट निर्देश मिळाले. त्यानुसार १५ हजार २८७ परवानाधारक रिक्षाचालकांना २ कोटी ३० लाख रुपये मिळणार आहेत. या ॲपबाबतची माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. २१) ला रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण केले जाणार आहे. शनिवारी (दि. २२) पासून या ॲपद्वारे रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांचा लाभ त्वरित संबंधित खात्यावर जमा होणार असल्याची माहिती अल्वारीस यांनी दिली.