तुमच्यातला आबा जिवंत करा!

By admin | Published: August 18, 2015 11:41 PM2015-08-18T23:41:40+5:302015-08-18T23:41:40+5:30

सिंधुताई सपकाळ : आबांच्या कुटुंबियांना जपण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Make your Aba alive! | तुमच्यातला आबा जिवंत करा!

तुमच्यातला आबा जिवंत करा!

Next

सावळज : कार्यकर्त्यांनो तुमच्यातला आबा जिवंत करा, सुमनसह आबांच्या कुटुंबियांना जपा. आबा त्यांच्या आयुष्यात गरिबी जगले, म्हणून त्यांना गरिबांच्या वेदना कळाल्या. त्यांनी मला भरभरुन दिले, पण देताना या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही. आबांसारखा दाता परत मिळणार नाही. ते आपल्याला सोडून गेले असले तरी, प्रत्येकाच्या हृदयात आबा विचाराच्या रूपाने जिवंत आहे. त्याला जिवंत करा व आबांचे विचार पुढे चालवा, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले.
सावळज (ता. तासगाव) येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आर. आर. आबा व किशोरदादा मित्रमंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम होते.
येणारी प्रत्येक रात्र संपणारी असते. रात्रीनंतर दिवस उगवतो, त्याप्रमाणे प्रत्येक संकटावर मात करता येते. फक्त धीर धरा. आई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व असतो. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे. ओरबाडण्याची नाही. मी रेल्वेत भीक मागत असताना गाड्या बदलल्या, पण जिंदगी बदलू दिली नाही. कितीही संकटे येऊ देत, जगता येते. फक्त पर्याय शोधा. समोरच्या व्यक्तीची चूक झाली, तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. माफ करणाऱ्याला माऊली म्हणतात. देशाची वेदना झाकण्यासाठीच महिलांचा जन्म झाला आहे. संस्कृती, परंपरा जपा, देशावर, मातीवर प्रेम करा, असे आवाहनही सिंधुताई सपकाळ यांनी केले.
मोहनराव कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या कल्पना सावंत, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील, राजू सावंत, गोरख पोतदार, विनायक पाटील, नितीन तारळेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील उपस्थित होते. किशोर उनउने यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक उनउने यांनी आभार मानले. (वार्ताहर)

भारती विद्यापीठाचे उपकार
मोहनराव, तुमच्या भारती विद्यापीठाने माझ्या मुलीला सांभाळले, म्हणून मी अनेक अनाथांची माय झाले. पतंगराव कदम व भारती विद्यापीठाचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत, म्हणून मी मोठी झाले, असे सिंधुतार्इंनी मोहनराव कदम यांना सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Web Title: Make your Aba alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.