Kolhapur: मेकरच्या संचालकांची अडीच कोटींची संपत्ती जप्त, मुख्य सूत्रधारासह १३ संशयितांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:42 AM2024-01-24T11:42:35+5:302024-01-24T11:42:51+5:30
मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेकर ॲग्रो इंडिया प्रायव्हेट ग्रुपच्या २३ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची सुमारे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
मेकर ॲग्रो कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. २०१० ते २०१८ या कालावधीत गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. याबाबत डिसेंबर २०१८ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २३ संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्राथमिक तपास झाल्यानंतर पुढे या गुन्ह्याचा तपास रखडला होता.
अखेर गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायाधीशांच्या आदेशाने तपासाला गती आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर १० संशयितांना अटक केली. यात गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रमेश महादेव वळसे-पाटील आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. अटकेतील संशयितांची दोन कोटी ३५ लाख १४ हजार ९३७ रुपयांची स्थावर मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. तसेच दोन लाख १० हजारांची जंगम मालमत्ता जप्त केली. बँकेतील एक लाखाची मुदत ठेवही गोठविण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी मालमत्तांचा शोध
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रमेश वळसे-पाटील याच्या आकुर्डी (पुणे) आणि कारकुडी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील फ्लॅटची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोन्ही मालमत्तांचे शासकीय मूल्यांकन करून जप्तीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अन्य संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.