Kolhapur: ५६ कोटींचा गंडा, मेकरच्या सूत्रधार दाम्पत्यास अटक; दोन कोटींची मालमत्ता जप्त

By उद्धव गोडसे | Published: January 1, 2024 07:18 PM2024-01-01T19:18:05+5:302024-01-01T19:18:52+5:30

कंपनीसह २३ जणांवर गुन्हा दाखल

Maker Group mastermind couple arrested for defrauding investors in kolhapur | Kolhapur: ५६ कोटींचा गंडा, मेकरच्या सूत्रधार दाम्पत्यास अटक; दोन कोटींची मालमत्ता जप्त

Kolhapur: ५६ कोटींचा गंडा, मेकरच्या सूत्रधार दाम्पत्यास अटक; दोन कोटींची मालमत्ता जप्त

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख रमेश महादेव वळसे-पाटील (वय ६०) आणि छाया रमेश वळसे-पाटील (वय ५४, दोघेही रा. आकुर्डी, जि. पुणे) या दाम्पत्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी (दि. ३१) पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, रमेश याला सहा दिवसांची, तर छाया यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अटकेतील संशयितांची सुमारे दोन कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करूनही भरलेले पैसे आणि त्यावरील परतावा परत मिळत नसल्याने डिसेंबर २०१८ मध्ये गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीसह २३ जणांवर गुन्हा दाखल झाला.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपासाची सूत्रे येताच निरीक्षक कळमकर यांनी तपासात गती घेतली आहे. गेल्या आठवड्यातील या गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती. त्यानंतर आता कंपनीचा प्रमुख आणि गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रमेश वळसे-पाटील आणि त्याची पत्नी छाया या दोघांना पुण्यातून अटक केली. 

दोन्ही संशयितांकडील सुमारे दोन कोटी रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. त्यांची बँक खाती गोठवण्यासाठी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली. आजपर्यंत या गुन्ह्यातील १० संशयितांना अटक झाली असून, अन्य १३ जणांचा शोध सुरू आहे.

Web Title: Maker Group mastermind couple arrested for defrauding investors in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.