दुर्बिणीचे निर्माते वसंतराव गुंडाळे, कोल्हापुरात अनेक अवलिये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:54 AM2017-12-07T00:54:12+5:302017-12-07T00:54:50+5:30
सहा इंची आणि बारा इंची दुर्बिणीसाठी वर्षभर झटले कोल्हापुरात अनेक अवलिये आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीवर स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणाºया बाबूराव पेंटर यांनी
संदीप आडनाईक
सहा इंची आणि बारा इंची दुर्बिणीसाठी वर्षभर झटले कोल्हापुरात अनेक अवलिये आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीवर स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणाºया बाबूराव पेंटर यांनी परदेशी कॅमेरा पाहून तसाच देशी बनावटीचा कॅमेरा इथेच तयार केला. तो मी नव्हेच या नाटकासाठी म्हादबा मेस्त्री यांनी फिरता रंगमंच इथेच उद्यमनगरीत तयार केला. या साºयांनी कोल्हापूरच्या कलेचा वारसाच केवळ जपला असे नव्हे, तर त्यांनी आपल्या या आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाचा ठसाही उमटविला. त्यांचाच वारसा चालविणाºयांच्या पंक्तीत खगोलप्रेमी वसंतराव गुंडाळे यांचे नाव घेता येईल.
वसंतराव हे मूळचे राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे. साखर कारखान्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंंग केमिस्ट म्हणून त्यांनी काम केले. १९९८ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी स्वत:चे कॅमेरा आणि प्रिंटरसंदर्भातील दुकान सुरू केले. याच्याजोडीलाच मित्र उत्तमराव खारकांडे यांच्यासोबत विज्ञान प्रसाराचे काम सुरू केले.
डॉ. आर. व्ही. भोसले हे खगोलप्रेमी शास्त्रज्ञ. त्यांच्या आकाशदर्शन मंडळात गुंडाळे हे खारकांडे यांच्यासोबत सहभागी झाले. आकाशदर्शनाचा छंद लागला. त्यातून गोडी वाढत गेली.
अवकाश दर्शनासाठी लागणारी दुर्बीण त्याकाळी फारच थोड्या लोकांकडे होती. डॉ. भोसले यांनी प्रेरणा देताच स्वत: अतिशक्तीशाली दुर्बीण बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यातून १९७२ मध्ये सहा इंची दुर्बीण त्यांनी बनविली. तेव्हा २५,000 रुपये त्यांना खर्च आला. या यशानंतर त्यांनी पुन्हा १९७४ मध्ये १२ इंची दुर्बीण बनविली. यासाठी ७0,000 खर्च आला. सहा इंची दुर्बिणीसाठी त्यांना वर्षभर कष्ट करावे लागले. १२ इंची दुर्बिणीसाठीही त्यांनी वेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले.
एकमेव दुर्बीण
वसंतराव गुंडाळे यांनी या दोन दुर्बिणीसाठी वर्षभर परिश्रम घेतले. या दुर्बिणींना आरसे बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पावडरने घासावे लागते. हे काम खूपच वेळखाऊ होते. डॉ. भोसले यांनी या दुर्बिणीसाठी लागणाºया अॅल्युमिनियमच्या कोटिंगसाठी मार्गदर्शन केले. त्यातून या दुर्बिणी साकारल्या. सध्या शिवाजी विद्यापीठात खगोलशास्त्राचे विद्यार्थी जी दुर्बीण वापरली जाते, ती अवघी पाच इंची आहे. गुडाळे यांच्या जिल्ह्यात एकमेव असणाºया या दोन्ही दुर्बिणींचा अवकाश निरीक्षणासाठी खूपच फायदा होतो.