मालवणी नृत्य महोत्सव पाच मेपासून
By admin | Published: April 28, 2017 12:02 AM2017-04-28T00:02:40+5:302017-04-28T00:02:40+5:30
बबन साळगावकर : स्थानिक कलाकारांना व्यासपीठ; अन्य कलाकारही सहभागी होणार
सावंतवाडी : मालवणी करंडक नृत्य महोत्सवात लोकनृत्यासह अन्य कलाप्रकार पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे. ५ ते ७ मेपर्यंत या महोत्सवाची धूम रंगणार आहे. यासाठी मुंबईतील कलाकार विलास पांचाळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.
सावंतवाडी नगरपालिका व भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकार कलामंचतर्फे आयोजित मालवणी करंडक नृत्य महोत्सवाची माहिती देण्यासाठी बबन साळगावकर यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, मालवणी करंडक महोत्सव समिती तथा ओंकार कलामंचचे अध्यक्ष अमोल टेंबकर, मालवणी करंडक समितीचे उपाध्यक्ष दादा मडकईकर, सचिन मोरजकर, हर्षद चव्हाण, सिध्देश सावंत, नारायण पेंडुरकर, शुभम पवार उपस्थित होते.
यावेळी साळगावकर म्हणाले, सावंतवाडी येथे कार्यरत असलेल्या ओंकार कलामंचच्या माध्यमातून हा नृत्य महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. गतवर्षीच्या एकांकिका महोत्सवानंतर यावर्षी नृत्य महोत्सव घेतला जात आहे. ५ ते ७ मे या कालावधीत पालिकेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर हा महोत्सव होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील, तसेच जिल्ह्याबाहेरील सुमारे पंधरा डान्स ग्रुप सहभागी होणार आहेत. यावेळी लोकनृत्य तसेच मालवणी टच असलेले विविध नृत्य प्रकार पाहायला मिळणार आहेत. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
साळगावकर पुढे म्हणाले, या महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, आदी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार शिवराम दळवी, युवा नेते संदेश पारकर, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज नाईक, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचा समारोप ७ मे रोजी सायंकाळी
७ वाजता होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, विशाल परब उपस्थित राहणार आहेत. त्याच रात्री १०.३० वाजता या महोत्सवातील स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, तालुकाध्यक्ष रूपेश राउळ, आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई येथील कॉमेडी एक्स्प्रेसचे कलाकार विलास पांचाळ करणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील अन्यही नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
खाद्यजत्रेचे आयोजन
मालवणी महोत्सवाचे औचित्य साधून या निमित्ताने कार्यक्रमाच्या परिसरात खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध फुडस्टॉल उभारण्यात येणार आहेत.
हे स्टॉल उभारताना महिला बचतगटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मालवणी पदार्थांसोबत अन्य सर्व पदार्थांचीही चव खवय्यांना चाखायला मिळणार आहे.