टँकरमधून महादेव महाडिकांना दहा वर्षांत १३४ कोटींचा मलिदा : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:17+5:302021-06-09T04:32:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ’)च्या टँकरमधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ’)च्या टँकरमधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गेल्या दहा वर्षांत तब्बल १३४ कोटी रुपये मिळाले आहेत. अनेक वर्षे ‘व्यंकटेश्वरा गुड्स मूव्हर्स’ व ‘कोल्हापूर आइस कोल्ड स्टोरेज’च्या माध्यमातून संघाचा मलिदा लुटण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. ‘गोकुळ’चा व्यवहाराची माहिती घेतल्यानंतर डोळे फिरले असून, संघाच्या पूर्वीच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंगसारखा होता, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केली.
सतेज पाटील म्हणाले, रोज मिळणारा मलिदा वाचवण्यासाठीच महाडिक संघाच्या निवडणुकीत ‘३:१३:२३’ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा ‘गोकुळ’मधील स्वार्थ लोकांसमोर आल्यानेच सत्तांतर झाले. पाटील यांनी महाडिक यांना प्रत्येक वर्षी टँकर भाड्यापोटी किती रक्कम मिळाली याचा गेल्या दहा वर्षांतील वर्षनिहाय रकमेचा चार्टच यावेळी पत्रकारांना उपलब्ध करून दिला. टँकर भाड्यापोटी महिन्याला किमान १ कोटी रुपये त्यांना संघातून मिळत होते, हे त्यावरून स्पष्ट झाले.
--------------------------------------------------
कोल्हापूर जिल्हा बँकेकडून म्हैस, गाय खरेदीसाठी ५०० कोटी
‘गोकुळ’च्या म्हैस दुधाला चांगली मागणी असून, दूध वाढीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवीन कर्ज योजना सुरू करत आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून पाचशे कोटी कर्जाचे वाटप करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
--------------------------------------------------