मलकापुरात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी !

By Admin | Published: February 10, 2016 12:17 AM2016-02-10T00:17:45+5:302016-02-10T01:09:50+5:30

पालिका निवडणूक : सत्ताधारी गटातच कुरबुरी

Malkapur allegations of farewell! | मलकापुरात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी !

मलकापुरात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी !

googlenewsNext


राजाराम कांबळे- मलकापूर
मलकापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून, पालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.
मलकापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे. मात्र, शहरात आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांनी तयारी चालविली आहे. तर काही उमेदवारांनी पालिकेच्या कारभाराची माहिती मागवून वातावरण निर्मिती केली आहे. पालिकेत सध्या वारणा समूहाचे नेते विनय कोरे-सावकर, उदय साखरचे नेते मानसिंगराव गायकवाड यांच्या राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीची सत्ता आहे. दोन्ही आघाडीचे सारथ्य जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, प्रकाश पाटील हे दोघे करीत आहेत, तर आमदार सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप विरोधकांची भूमिका बजावत आहेत. गेली साडेचार वर्षे पालिकेच्या राजकारणात सत्ताधारी गटाने विरोधकांना चांगलेच मॅनेज करून टाकले आहे.
पालिकेत विरोधी पक्ष आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. गेल्या साडेचार वर्षांत सुमारे सहा कोटींची विकासकामे झाली आहेत.
या कामावरूनच सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू आहेत. पालिकेत सत्ताधारी गटाने नवीन पंचवीस कामगारांची नियुक्ती करून सदर कामाचा ठेका मजूर संस्थेस दिला आह. मात्र, या कामात मोठा ढपला पाडल्याची चर्चा शहरात सुरू आहे, तर विठ्ठल मंदिर बांधकाम संरक्षण भिंत, आदी कामाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सत्ताधारी गटात दोन गट पडले आहेत. त्यामुळे जनसुराज्य पक्षाने या कामाची माहिती मागवून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी पाच वर्षांच्या कामाची माहिती अधिकारात माहिती मागविली आहे. त्यामुळे ठेका पद्धतीत कामगाराच्या नावावर कोणी ढपला पाडला हे उघड होणार आहे. पालिका प्रशासन बेकायदेशीर कारभार करीत आहे, अशी तक्रार भाजपचे राज्य कमिटी सदस्य राजू प्रभावळकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. तर माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पालिका कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी तक्रार केली आहे. यामुळेच मुख्याधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. पालिका निवडणूक जवळ जवळ येऊ लागताच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकूणच पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली जाणार आहेत.

खमंग चर्चा
गेल्या साडेचार वर्षांत विकासकामात कोणी ढपला पाडला, मलई खाल्ली याचा भांडाफोड होणार आहे. शहरातील चौका-चौकात याची खमंग चर्चा सुरू आहे.


पालिकेच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी ढपला पाडला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- राजू प्रभावळकर, माजी नगरसेवक (भाजप)


कामगारांच्या पगारात काही अफरातफर असेल, तर चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करणार, कामगारांना न्याय देणार.
- प्रकाश पाटील, आघाडी प्रमुख (राष्ट्रवादी)

कामगारांच्या वेतनातून पैसे खाणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आहे.
- सर्जेराव पाटील, आघाडी प्रमुख (जनसुराज्य)

Web Title: Malkapur allegations of farewell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.