मलकापूर-पालेश्वर धरणाच्या सांडव्याला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:16+5:302021-07-26T04:23:16+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरणाच्या सांडव्याला भगदाड पडल्याने शाळी नदीकाठावर असणाऱ्या मलकापूर, येळाणे बाजारपेठेत पुराचे ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरणाच्या सांडव्याला भगदाड पडल्याने शाळी नदीकाठावर असणाऱ्या मलकापूर, येळाणे बाजारपेठेत पुराचे पाणी शिरून व्यापारी, रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. या घटनेस जबाबदार असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शाळी नदीकाठी असणारे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
पाटबंधारे विभागाने शाळी नदीवर ८.७९ दलघमी क्षमतेचे धरण बांधले आहे. धरण बांधल्यापासून धरणाची डागडुजी करण्यात आलेली नाही. तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. धरणांच्या सांडव्याची भिंत कमकुवत झाली असतानादेखील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. बुधवार दि. 22 जुलै रोजी मध्यरात्री धरणाच्या सांडव्याची भिंत पडल्यामुळे धरणातून पाण्याचा लोट नदीत जाऊन मलकापूर, येळाणे गावात पुराचे पाणी शिरले. अचानक रात्री पुराचे पाणी घरात, दुकानात शिरल्याने नागरिकांचा एकच हाहाकार उडाला. घरात व दुकानात पाणी शिरून व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फोटो
शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड.