‘डबल महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळवणारा मल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:32 AM2019-10-21T00:32:25+5:302019-10-21T00:32:29+5:30

कोल्हापूर : पैलवान दादू चौगुले यांनी पुणे आणि अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या मैदानात प्रतिस्पर्धी मल्लांचा ...

Mall receiving the honor of 'Double Maharashtra Kesari' | ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळवणारा मल्ल

‘डबल महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळवणारा मल्ल

Next

कोल्हापूर : पैलवान दादू चौगुले यांनी पुणे आणि अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या मैदानात प्रतिस्पर्धी मल्लांचा पराभव करून सलग नववी आणि दहावी ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा कोल्हापूरला मिळवून दिली.राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने सन १९७० मध्ये पुणे शहरातील नेहरू क्रीडांगणावर परिषदेचे १५ वे आणि मानाच्या गदेचे नववे अधिवेशन भरविण्यात आले होते.
सन १९६९ मध्ये दादू चौगुले यांना पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांच्याकडून गुणांवर पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, पुणे येथील अधिवेशनात गदा मिळविण्याचा निर्धार करून ते कुस्ती मैदानात उतरले. या स्पर्धेत त्यांनी पहिल्या फेरीपासून चितपट कुस्त्या केल्या. सोलापूरचे पैलवान पवार यांना घिस्सा डावावर चितपट करून त्यांनी अंतिम फेरी गाठली. या अंतिम फेरीत त्यांची लढत पुणे येथील मल्ल परशुराम पाटील यांच्याशी झाली. ताकदीने वरचढ असणाऱ्या चौगुले यांनी या लढतीमध्ये पाटील यांच्याविरोधात तीन गुणांची कमाई करीत ‘महाराष्ट्र केसरी’ची नववी गदा पटकविली. अलिबाग येथे सन १९७१ मध्ये राज्य कुस्तीगीर परिषदेचे १६ वे आणि मानाच्या गदेचे दहावे अधिवेशन झाले. त्यामध्ये चौगुले यांनी धुळे येथील पैलवान संभाजी पवार यांना चितपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत चौगुले यांची सातारा येथील पैलवान साहेबराव जाधव यांच्याशी लढत झाली. त्यामध्ये चौगुले यांनी जाधव यांच्यावर गुणांवर विजय मिळवीत ‘डबल महाराष्ट्र’ केसरी होण्याचा बहुमान पटकविला.

‘रुस्तम-ए-हिंद’ची
लढत विस्मरणीय
मुंबई येथे १ मार्च १९७३ रोजी भरलेल्या राष्ट्रीय कुस्ती अधिवेशनात दादू चौगुले व हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यात लढत झाली. यात डाव-प्रतिडाव करीत एकमेकांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या दादू चौगुले यांनी ५९ सेकंदांत ढाक डावावर त्यांना चितपट केले. त्यानंतर दुसºया दिवशी मध्यवर्ती बसस्थानकापासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक नवा पूल-लक्ष्मीपुरी-आईसाहेब महाराज पुतळा- भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर-मिरजकर तिकटी-अशी येऊन एम.एल.जी. हायस्कूल येथे विसर्जित करण्यात आली होती. त्यात स्वत: गणपतराव आंदळकर, चंबा मुत्नाळ हेही अग्रभागी होते.

... अन् सादिकला दोन मिनिटांत चितपट
पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी याच्याबरोबर १६ एप्रिल १९७८ रोजी झालेल्या रंगतदार लढतीत रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांनी त्याला दोन मिनिटांत घिस्सा डावावर चारीमुंड्या चितपट केले. ही कुस्तीही त्या काळी विशेष स्मरणात राहिली. आजही अनेक जुने-जाणते दादूमामांची ही आठवण काढतात.

जोडीतील दुसरा दिग्गज हरपला
दादू चौगुले यांचे खास मित्र म्हणून कुस्तीसम्राट युवराज पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी एका अपघातात निधन झाले; त्यामुळे चौगुले हे एकटे पडले. तरीसुद्धा मोतीबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे व व्यवसाय सांभाळत त्यांनी कुस्तीची अखंड सेवा केली. त्यांच्या जाण्याने दुसरा दिग्गज मल्ल निघून गेल्याची भावना कुस्तीशौकिनांमधून व्यक्त होत होती.

‘हिंदकेसरी’चे स्वप्न विनोदकडून पूर्ण
नाशिक येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत दादू चौगुले यांचा मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ विनोद चौगुले याने त्यांचे ‘हिंदकेसरी’चे स्वप्न पूर्ण केले. स्वत: दादू चौगुले यांनी त्याला संपूर्ण मार्गदर्शन केले होते. पहाटे साडेचारपासून ते मोतीबाग तालीम येथे स्वत: त्याचा कसून सराव घेत असत. त्यांचे ‘हिंदकेसरी’चे स्वप्न विनोद याने सेनादलाच्या मल्लावर मात करीत पूर्ण केले.

Web Title: Mall receiving the honor of 'Double Maharashtra Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.