कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीत ढपला, एकाच कामासाठी निधीचा दोनदा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:02 PM2024-05-13T17:02:41+5:302024-05-13T17:02:59+5:30
पाण्याचा निचरा, दरवाढ, वास्तुविशारदवर दोन कोटींची मुक्त हस्ते उधळण
‘क्रीडानगरी’ अशी कोल्हापूरची ओळख. मात्र, त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असलेल्या खेळाडूंना प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचा अजूनही कामाचा पहिला टप्पा सुरू आहे. जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, जलतरण तलावाचा डेक आणि संरक्षक भिंत, प्रेक्षक गॅलरी, फिल्टर रुम, प्रेक्षक गॅलरीचे तीन-तेरा वाजले आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या क्रीडा संकुलात आलेल्या २१ कोटी ८९ लाख रुपयांच्या निधीचा वापर एकाच कामासाठी दोनदा झाल्याचे उघड झाले आहे. या सर्वांचा वेध घेणारी मालिका आजपासून...
सचिन यादव
कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलासाठी आजअखेर २४ कोटी पैकी २१ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाले आहेत. कागदावर अनेक कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याचे दाखविले जात असले तरी क्रीडा संकुलातील काही कामे अपूर्ण आहेत. राज्यभर गाजलेला आणि कोट्यवधी रुपये खर्च झालेला जलतरण तलाव ओस पडला आहे. प्रत्यक्षात झालेला खर्च आणि क्रीडा संकुलात खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधांची मोठी वानवा आहे. या क्रीडा संकुलाच्या कामात अनेकांनी ‘लाखमोला’ची कामगिरी बजाविली आहे. २००९ पासून ते आजअखेर क्रीडा संकुलाचा खेळखंडोबा सुरू आहे.
क्रीडा संकुलातील प्रत्यक्षात झालेली कामे, दिरंगाई, प्रस्तावित आराखडे, अनेक चौकशी समितीचे कामकाज पाहिले. मात्र, प्रत्यक्षात झालेली कामे आणि त्यासाठी लाखांतील खर्चाचा निधी पाहता अनेकांचे डोळे दीपवणारा आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडा संकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे कैद्याची शेती असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली.
मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये निधी उपलब्ध केला होता. त्यानंतर काही कोटींची निधीत वाढही करण्यात आली. मात्र, अद्याप संकुलात अजूनही अनेक कामांवर लाखो रुपयांचा खर्च दाखविला जात आहे, प्रत्यक्षात खेळाडूंसाठी असुविधाजनक आहे.
क्रीडा संकुलातील घोषणा
४०० मीटर धावपट्टी, टेनिस कोर्ट, खो-खो, कबड्डी, फुटबॉल मैदान, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, शूटिंग रेंज, जलतरण तलाव, विविध खेळांसाठी इनडोअर मैदान, अपंगांसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल, हॉकी खेळाडूंसाठी वसतिगृह.
पहिल्या टप्प्यात झालेला खर्च
- जमिनीची समपातळी करणे : ५५ लाख ६१ हजार ९ रुपये
- मुख्य प्रवेशद्वाराजवळील दोन्ही बाजूची संरक्षक भिंत : १५ लाख १४ हजार १८९
- बास्केटबॉल, व्हॉलिबॉल क्रीडांगणातील संरक्षक जाळी : ४ लाख ३१ हजार ७२
- ४०० मीटर ट्रॅक सभोवतालची संरक्षक भिंत : २३ लाख २६ हजार ९२५
- संपूर्ण जागेभोवतालची संरक्षक भिंत : ९९ लाख १० हजार ३४५
- ४०० मीटर ट्रॅक : ६५ लाख, ९७ हजार ५०१
- फुटबॉल क्रीडांगण : ४१ लाख ५४ हजार ९ रुपये
- जलतरण तलाव : ७१ लाख ६९ हजार ५९६
- डायव्हिंग तलाव : १ कोटी ५ लाख २३ हजार ३१५
- जलतरण तलावाचा डेक, संरक्षक भिंत : ६३ लाख ३९ हजार १३९
- जलतरण तलाव प्रेक्षक गॅलरी, फिल्टर रूम : १ कोटी २० लाख ९४ हजार ११४
- डायव्हिंग प्लॅटफार्म : ११ लाख ४१ हजार १००
- टेनिस कोर्ट : ७७ लाख ९१ हजार ९६८
- टोनिस कोर्ट सभोवतालची संरक्षक जाळी : १२ लाख २८ हजार ६२८
- टेनिस कोर्ट प्रेक्षक गॅलरी : ३३ लाख ७६ हजार ९७१
- शूटिंग रेंज : ४ कोटी २३ लाख ३८ हजार ८४९
- बास्केटबाॅल क्रीडांगण : १८ लाख ३७ हजार ८५७
- खो-खो, कबड्डी, क्रीडांगण : १० लाख ५९ हजार २३९
- व्हॉलिबॉल क्रीडांगण : ११ लाख ८७ हजार १०४
- अंतर्गत रस्ता : ५६ लाख ११ हजार ९१२
- जमिनीखालील पाण्याची टाकी : ११ लाख ५२ हजार ३५५
- विद्युतीकरण : ७९ लाख ७९ हजार ४८२
- इलेक्ट्रिक सबस्टेशन : ६ लाख ७० हजार २१३
- पाणी निर्गतीकरण : ५६ लाख, ५१ हजार ६२९
- दरवाढ : १ कोटी ८७ लाख ६ हजार ६२५
- वास्तुविशारद शुल्क : ८३ लाख ५ हजार ८८
- शूटिंग रेंज अद्ययावतीकरण : ३ कोटी २२ लाख १८ हजार २२ रुपये
- एकूण खर्च २१ कोटी ८९ लाख रुपये
पाच जिल्ह्यांसाठी नियोजन केलेले क्रीडा संकुल पूर्ण क्षमतेने खेळाडूंसाठी वापरात नाही. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाचे स्वप्न अजूनही अपुरे आहे. त्या-त्या स्तरावरील तालुका स्तरावरील क्रीडा संकुल विकसित करणे गरजेचे आहे. -आर. डी. पाटील, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते