मालतीताई किर्लोस्कर यांचे निधन

By admin | Published: March 14, 2017 12:16 AM2017-03-14T00:16:21+5:302017-03-14T00:16:21+5:30

सांगलीत अखेरचा श्वास : व्रतस्थ लेखिका हरपल्याची मान्यवरांची भावना

Maltaitai Kirloskar dies | मालतीताई किर्लोस्कर यांचे निधन

मालतीताई किर्लोस्कर यांचे निधन

Next

सांगली : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्यरत राहून लेखनशैलीचा, अध्यापनाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या लेखिका प्रा. मालतीताई शंकरराव किर्लोस्कर (वय ९४) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्य, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी सायंकाळी विश्रामबाग येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
ज्येष्ठ उद्योजक आणि किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक शंकरराव किर्लोस्कर यांच्या मालतीताई कन्या, तर ज्येष्ठ पत्रकार मुकुंद किर्लोस्कर यांच्या भगिनी होत. त्या अविवाहित होत्या. किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथे त्यांचा जन्म झाला. किर्लोस्करवाडी येथे प्राथमिक शिक्षण आणि पुण्याजवळील हिंगणे येथील आण्णासाहेब कर्वे यांच्या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी तेथेच ३८ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. वाचन आणि लेखन या आवडीच्या प्रांतात त्या रमल्या. वडिलांच्या लेखन साहित्याचा वारसा त्यांनी तितक्याच ताकदीने जपला आणि पुढे नेला.
ललित लेखन हा त्यांचा अत्यंत आवडता विषय. उत्कट संवेदनशीलता, उत्तम निरीक्षणशक्ती, मानवी संबंधांविषयीची आस्था, उत्फुल्ल विनोदबुद्धी, जाणती रसिकता अशा अनेक गुणधर्मांनी त्यांची लेखनशैली समृद्ध बनली होती. कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, रा. श्री. जोग, वामन मल्हार जोशी अशा अनेक दिग्गज साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला. निवृत्तीनंतर विश्रामबाग येथील ‘पसायदान’या निवासस्थानी त्या रहात होत्या. समकालीन साहित्यिकांची त्यांच्या घरी ये-जा असे. साहित्यिक चर्चांच्या मैफलीही त्यांच्या घरी रंगात. वाड़्मयीन नियतकालिके, मासिकांमध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले. ‘फुलांची ओंजळ’ आणि ‘भक्तिभाव’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
अखंड लेखन आणि वाचनाचा त्यांचा व्यासंग सांगलीतील जुन्या-नव्या लेखकांवर प्रभाव पाडणारा ठरला. घरी जोपासलेला हजारो पुस्तकांचा संग्रह त्यांनी काही दिवसांपूर्वी विलिंग्डन महाविद्यालयास भेट म्हणून दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. (प्रतिनिधी)

रुग्णालयात गर्दी
मालतीतार्इंच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातील शिक्षण, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालय परिसरात तसेच निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

Web Title: Maltaitai Kirloskar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.