पैशांसाठी मालती पाटीलचा खून
By admin | Published: December 7, 2015 12:47 AM2015-12-07T00:47:14+5:302015-12-07T00:53:34+5:30
संशयित आरोपीची कबुली : रांगणागडच्या शंभर फूट दरीत दिले फेकून; मृतदेह ४८ तासांनंतर बाहेर
कोल्हापूर : नागाळा पार्क परिसरातून बेपत्ता झालेल्या मालती रामगौंडा पाटील (वय ५२) हिचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मालती ही आपली प्रेयसी होती. तिने मुलीच्या नावे बँकेत ठेवलेले ५७ लाख रुपये आपल्याला देण्यास नकार दिल्याने भुदरगड येथील रांगणागडाच्या शंभर फूट दरीत फेकून तिचा खून केल्याची कबुली संशयित आरोपी संतोष गंगाराम मर्गज (३५, रा. संभाजीनगर) याने दिली आहे. दरम्यान, मालती पाटील हिचा मृतदेह ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून बाहेर काढण्यात आला. संशयित आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे जाळल्याचे घटनास्थळावर दिसून आले, अशी माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी, मालती पाटील व संतोष मर्गज हे दोघेही नागाळा पार्क येथील उद्योगपती विलास आनंदराव ढोमके यांच्या बंगल्यात कामास होते. १४ नोव्हेंबरला दोघेही बेपत्ता झाले होते. याबाबत ढोमके यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मालती व संतोष बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने मालवण येथून संतोषला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मालतीबाबत चौकशी केली असता त्याने ती आपल्यासोबत पळाल्याचे मान्य करीत आपण भुदरगड येथील रांगणागडावर फोटो काढत असताना ती दरीत कोसळल्याची माहिती दिली. परंतु, संतोषने तिचा खून करून मृतदेह दरीत टाकल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपीने प्लॅन करून केला गेम
संतोष मर्गज व मालती पाटील यांचे प्रेमसंबंध होते. मालती हिने मुलीच्या नावे बँकेत ५७ लाख रुपये ठेवले होते. त्यावरून संतोष हा तिच्याशी वारंवार भांडण करीत होता. ती आपल्याला पैसे देणार नाही, याची खात्री झाल्यानंतर त्याने दिवाळीच्या भाऊबिजेदिवशी तिला संपविण्याचा प्लॅन आखला.
‘भुदरगड येथील रांगणागडावर गुप्तधन आहे. ते काढून आपण एकमेकाला वाटून घेऊ’, असा बनाव करून भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिला दुचाकीवरून घेऊन तो त्या ठिकाणी आला. तिचा विश्वास बसण्यासाठी येथे एका ठिकाणी खुदाई केली. खुदाईसाठी मालतीनेही मदत केली. मात्र, गुप्तधन सापडत नाही, याची खात्री झाल्यानंतर मालतीने ‘तू मला खोटे का सांगितलेस’ म्हणून त्याला विचारणा केली.
यावेळी ‘मुलीच्या नावे बँकेत ठेवलेले पैसे मला काढून दे’, असे त्याने म्हटल्यानंतर तिने ठामपणे नकार दिला. यावेळी त्याने तिच्या नाकावर ठोसा मारताच ती रक्तबंबाळ होऊन खाली बसल्यानंतर तिला ओढत शंभर फूट दरीमध्ये फेकून दिले. त्यानंतर दरीमध्ये उतरून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून ते त्याच ठिकाणी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेथून तो दुचाकीवरून मालवण येथे आला. दरम्यान, त्याने पोलिसांना गुप्तधनासाठी खोदलेली जागा, तिला मारहाण केली ते ठिकाण व दरीत फेकून दिल्याचे घटनास्थळ स्वत: दाखविले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने मालतीचा मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह तिचाच आहे, हे तिच्या पतीने व नातेवाइकांनी ओळखले. या खून प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
लाखो रुपये आले कोठून?
मालती पाटील ही उद्योगपतीच्या घरी कामाला होती. तिने मुलीच्या नावे बँकेत ५७ लाख रुपये ठेवल्याचे संतोष याने सांगितले, परंतु लाखो रुपये तिच्याकडे कोठून आले? याची पोलिसांनाही शंका आहे. ती रक्कम आहे की संतोष खोटे बोलत आहे, याबाबतची खात्री पोलीस करीत आहेत.