माळवींनी पक्षादेशही धुडकावला

By admin | Published: March 1, 2015 12:33 AM2015-03-01T00:33:49+5:302015-03-01T00:37:04+5:30

आज हकालपट्टी शक्य : महाडिक गटाच्या नगरसेवकांकडून मदत

Malvi also defeated the party | माळवींनी पक्षादेशही धुडकावला

माळवींनी पक्षादेशही धुडकावला

Next

 कोल्हापूर : महापौरपदाचा राजीनामा २८ फेब्रुवारीपर्यंत द्या, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला इशारावजा पक्षादेश महापौर तृप्ती माळवी यांनी शनिवारी धुडकावल्याचे स्पष्ट झाले. शनिवारपर्यंतची मुदत संपल्यानंतरही माळवी यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पक्षातून काढून टाकण्याची औपचारिकता आज, रविवारी पार पाडली जाईल, असे सांगण्यात आले.
तृप्ती माळवी यांना महापौरपदावर काम करण्याची सहा महिन्यांकरिता मुदत दिली होती; परंतु त्यांची मुदत संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यातच त्या लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. दबाव झुगारुन राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. दस्तुरखुद्द हसन मुश्रीफ यांनी पक्षातून काढून टाकण्याचाही इशारा दिला, पण त्यालाही त्यांनी जुमानले नाही. माजी नगरसेवक सुनील मोदी व सुहास लटोरे यांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे.
काटा काढला नाही,तर मोडलाय
महापौरांचा राजीनामा होऊ नये म्हणून काहीजण प्रत्यक्ष, तर काही अप्रत्यक्ष प्रयत्न करत आहेत. या सर्वांना अनेक घटनांचा राजकीय काटा काढायचा होता. सई खराडे या ताराराणी आघाडी सोडून ‘जनसुराज्य आघाडी’त गेल्या. त्यावेळी हसन मुश्रीफ स्वत: त्यांना भेटायला गेले होते. महाडिकांची मक्तेदारी मोडण्यात मुश्रीफ आघाडीवर होते. तो राग महाडिक यांच्या मनात होताच. दुसरा राग सागर चव्हाण व संभाजी बसुगडे यांच्यातील महापौरपदासाठीच्या संघर्षाबद्दलचा आहे. चव्हाण व बसुगडे यांना सहा-सहा महिन्यांचे महापौर करायचे ठरले होते; परंतु सागर चव्हाण यांनी राजीनामाच दिला नाही. त्यामुळे बसुगडे यांना महापौर होता आले नाही. त्यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांची चव्हाण यांना साथ होती. दोन अपमान महाडिक यांना पचवायला लागले होते. त्याचा आता माळवी यांना मदत करून बदला घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. तिसरा राग हा मृदुला पुरेकर यांना स्थायी समिती सभापती न करण्याचा आहे. पुरेकर यांना स्थायी समिती सभापती किंवा महापौर करण्याचा शब्द दिला होता,त्यामुळे पुरेकर नाहीत, तर मग कोणीही नाही अशी पुरेकर समर्थक नगरसेवकांनी भूमिका घेऊन मुश्रीफ-पाटील यांना शह दिला जात आहे. ‘काटा काढला नाही, तर तो मोडला आहे’ ही प्रा. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Malvi also defeated the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.