माळवींचे नगरसेवकपद रद्दला स्थगिती नाही; पुढील सुनावणी ६ जुलैला
By admin | Published: June 24, 2015 01:03 AM2015-06-24T01:03:06+5:302015-06-24T01:03:43+5:30
महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करा; महापालिकेचे विभागीय आयुक्तांना पत्र
कोल्हापूर : राज्य शासनाने नगरसेवकपद रद्दची केलेली कारवाई मागे घ्यावी, या तृप्ती माळवी यांच्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने याप्रकरणी कोणताही स्थगिती आदेश न देता पुढील सुनावणी ६ जुलैला होईल, असे स्पष्ट केले. स्वीय सहायकामार्फत १६ हजारांची लाच स्वीकारल्याचा ठपका ठेवत तृप्ती माळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लाचखोरीनंतरही महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या माळवी यांच्यावर महापालिका अधिनियम कलम १३ (१) (अ) व (ब) नुसार नगरसेवकपद रद्दची कारवाईची मागणी सभागृहाने केली होती. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले. राज्यमंत्र्यांच्या या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी माळवी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने स्थगिती आदेश न देता ६ जुलैला सुनावणीचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करा; महापालिकेचे विभागीय आयुक्तांना पत्र
माळवी यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्या अनुषंगाने महापौरपदही रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठंी तत्काळ निवडणूक घ्यावी, निवडीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांना पाठविले आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाने लवकरच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महापौरपदावर सतेज पाटील गटाच्या मीना सूर्यवंशी, दीपाली ढोणुक्षे किंवा वैशाली डकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.