सिमेंटच्या जंगलात माणूस ‘एकटाच’
By admin | Published: December 25, 2014 11:31 PM2014-12-25T23:31:43+5:302014-12-26T00:05:39+5:30
चित्रपट महोत्सव : बाळकृष्ण व संतोष शिंदे यांचा रसिकांशी मुक्त संवाद
कोल्हापूर : शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामध्ये राहणाऱ्या माणसाकडे खूप सुखसुविधा आहेत; पण त्यांचा मनस्वीपणे उपभोग घेता येत नाही. कधी घड्याळाच्या काट्यावर, कधी ताणतणाव, गर्दीतही वाट्याला येणारे एकटेपण, विचित्र जीवनशैली यांमुळे खेळ करणाऱ्या माकडासारखी माणसाची अवस्था झाली आहे. या अवस्थेकडे निरागस नजरेतून पाहणाऱ्या मुलाची कथा म्हणजे ‘अपसाइड डाउन’ हा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया देत सहदिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे व अभिनेता संतोष शिंदे, विकास पाटील यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला.
शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, गुरुवारी या चित्रपटाच्या चमूने रसिकांना चित्रपटाच्या निर्मितीेचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, खेड्यात राहणाऱ्या लहान मुलाला शहरात सर्कस आल्याचे कळते. ती पाहण्यासाठी तो या शहरात येतो; पण येथे प्रत्येकाची सुरू असलेली जगण्याची लढाई, घड्याळामागे सुरू असलेली धावाधाव, गर्दीत राहूनही वाट्याला येणारे एकटेपण हे सगळे तो अनुभवतो. माणूसपण हरवलेल्या माणसाची सर्कशीतील माकडासारखी झालेली अवस्था आणि त्याकडे बघण्याचा त्या मुलाचा दृष्टिकोन सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा ठरतो. या चित्रपटात शुभम मोरे, पार्थ भालेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संवादानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाचा आस्वाद घेतला. दिवसभरात अपूर पांचाली, द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल, बेस्ट्स आॅफ द सदर्न वाइल्ड, अपसाइड डाउन, गोल्ड अॅँड कॉपर आर्टिस्ट, अग्निपंख, कँडल मार्च, लाईक फादर-लाईक सन हे चित्रपट दाखविले.
महोत्सवात आज
स्क्रीन नं १ : कँडल मार्च (मराठी), लाइक फादर-लाईक सन (जपान), द कफिन मेकर (गोवा).
स्क्रीन नं २ : गोल्ड अॅँड कॉपर (इराण), वाइंड्स आॅफ सप्टेंबर (तैवान), अपसाइड डाउन (मराठी), बेस्ट्स आॅफ सदर्न वाईल्ड (यूएसए), कागज के फूल (हिंदी).
स्क्रीन नं ३ : इंडियन पॅनोरामा शॉर्ट फिल्म. ४ वाजता : मिफ १४ शॉर्ट फिल्म.