गावठी बंदुका तयार करणाऱ्या तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:40 AM2019-08-03T11:40:50+5:302019-08-03T11:46:00+5:30
बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिताफीने अटक केली. संशयित गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून नऊ बंदुका व साधनसामग्री असा पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व बंदुका घरी बनविल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिताफीने अटक केली. संशयित गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून नऊ बंदुका व साधनसामग्री असा पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व बंदुका घरी बनविल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात होत असलेल्या घरफोडी, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसणेकरिता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार वसंत पिंगळे गस्त घालत असताना त्यांना खबऱ्यांकडून शहरामध्ये एक तरुण १२ बोअरच्या गावठी बंदुका विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईच्या सूचना देताच सहायक फौजदार संदीप जाधव, वसंत पिंगळे, प्रथमेश पाटील, विशाल चौगले, अशोक पाटील, किरण वावरे, युवराज पाटील, प्रशांत घोलप, नारायण कोरवी, विनायक फराकटे, धर्मेंद्र बगाडे यांनी १ आॅगस्टला मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा लावला.
सायंकाळी पाचच्या सुमारास बसस्थानकजवळील परीख पुलाच्या दिशेने एक तरुण हातामध्ये गोणपाट घेऊन संशयास्पद चालत येत असताना दिसला. खबऱ्यांच्या इशाऱ्यानंतर त्याला पकडून गोणपाटची झडती घेतली असता, त्यामध्ये गावठी बनावटीची सिंगल बॅरेलची १२ बोअरची बंदूक मिळून आली. ती विना परवाना असल्याचे निष्पन्न झाले. ती कोठून आणली याबाबत विचारपूस केली असता, घरी स्वत: बनविल्याची कबुली दिली. त्याचे शिवडावपैकी वांजोळेवाडी येथील घरी छापा टाकला असता, बंदूक तयार करण्याचा कारखाना मिळून आला.
कारखान्यात चार, शेतातील शेडमध्ये चार अशा एकूण नऊ बंदुका हस्तगत केल्या. बंदूक तयार करण्याची साधनसामग्री जप्त केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बंदुका बनविण्यासाठी आणखी कोणाचा हातभार आहे, तो साहित्य कोठून विकत घेत होता, याची माहिती पोलीस घेत आहेत.
संशयित पाचवी नापास
संशयित गोविंद सुतार हा पाचवी नापास आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता दुचाकी पूर्ण खोलून दोन तासांत जोडून देण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे; त्यामुळे परिसरातील दुचाकी दुरुस्तीसाठी त्याच्याकडे रांग लागायची. तो बंदुका दुरुस्ती, साफ करून देण्याचे काम करीत होता. गावातील व परिसरातील काही बंदुका त्याच्याकडे कामाला येत असे. त्या निखळून त्याने पाहणी केली.
त्यामध्ये लागणारे साहित्य खरेदी करून तो स्वत:च बंदुका बनवू लागला. आतापर्यंत त्याने ५० पेक्षा जास्त बंदुका बनविल्याची गोपनीय माहिती आहे. त्या कोणाला विक्री केल्या आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी त्यांनाही पोलीस आरोपी करणार आहेत, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
शिकारीसाठी वापर
संशयित सुतार याच्याकडे लोक शिकारीसाठी बंदुका पाहिजे म्हणून आॅर्डर देत होते. त्यानुसार तो बंदुका बनवून द्यायचा. जप्त केलेल्या बंदुकांचा शिकारीसाठी वापर झाल्याची शक्यता आहे. वनविभागालाही याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवडावपैकी वांजोळेवाडी परिसरात बंदुका कोण वापरत आहेत. त्या परवाना अथवा विनापरवाना आहेत काय, याची स्थानिक पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.