रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी, कवटीची डीएनए चाचणी होणार; आजऱ्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:53 PM2022-05-11T12:53:53+5:302022-05-11T12:54:31+5:30
कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
आजरा : आजऱ्याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर माणसाची कवटी सापडली आहे. विजेच्या डांबाच्याखाली असणारी कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे.
सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना विजेच्या डांबाच्याखाली माणसाची कवटी असल्याचे लक्षात आले. दरम्यान, रामतीर्थ पर्यटन स्थळाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. कवठी कशाची असावी, येथे कोणी आणून टाकली, भोंदूगिरी करण्यासाठी आणली असावी का ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आजरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या कवटीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असून या कवटीची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली.